शरद पवार या व्यक्तीकेंद्रीत राजकारणापुरतेच तुम्ही मर्यादित आहात का? – जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : २ मे – राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना तसेच औरंगाबादमधील सभेसंदर्भात भाष्य करताना आव्हाडांनी टीका केलीय. “किती सभा झाल्या असतील बाळासाहेबांच्या आणि शरद पवारांच्या याची मोजणी केली तर राज ठाकरे गुणिले हजार. इतक्या सभा झाल्या असतील त्यांच्या म्हणजे साहेबांच्या निवडणुकीतील सभा ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्या सुरु व्हायच्या सकाळी आठला आणि त्या काळात संपायच्या दोनला. त्या काळात पवारांची अमरावतीला सभा झालेली तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा सभेच्या एक दिवस आधी त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले जिथे. तेव्हा अधिक काही बोलायला लावू नका,” असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरेंना लगावलाय.
आव्हाड यांनी याच मुद्द्यावरुन बोलताना राज यांच्या भाषणामध्ये केवळ शरद पवारांवर टीकेचा समावेश होता या मुद्द्यावरुन टीका केलीय. “महाराष्ट्रापुरत्या काही समस्या नाहीयत का, देशापुढे काही समस्या नाहीयत का. तुमचे राजकीय विचार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकच्या दाराबाहेर येऊन संपतात का? शरद पवार या व्यक्तीकेंद्रीत राजकारणापुरतेच तुम्ही मर्यादित आहात का?,” असा प्रश्न आव्हाड यांनी राज ठाकरेंना विचारलाय. तसेच, “समाजाचे इतर काही प्रश्न आहेत, इतर काही लढे आहेत हे तुम्हाला तुमच्या भाषणातून मांडता येत नाही का?,” असंही आव्हाड यांनी विचारलं आहे.
चैत्यभूमीचाही केला उल्लेख…
“आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज ठाकरेंसारखा उत्कुष्ट वक्ताच नाहीय. पण म्हणून तुम्ही शरद पवारांना टार्गेट करुन गोळ्या मारतायत. मला समजत नाही तुम्हाला त्यातून मिळणार काय आहे,” असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. पुढे बोलताना आव्हाड यांनी, “महाराष्ट्र अनेक दृष्ट्याने विचार करत असतो. हा विचारवंताचा, ऋषी मुनींचा, संतांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र उगाच नाही घडला. उगाच नाही इतके क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर तयार झाले. उगाच नाही इते एवढं साहित्य तयार झालं. तो हा इथल्या मातीचा आणि नद्यांचा गुण आहे. जरा जमलं तर चैत्यभूमीला जाऊन या दर्शन घेऊन या म्हणजे तुम्हाला हे समजेल की भारताच्या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे, कारण आपण भारताचे नागरिक आहोत,” असा टोला आव्हाड यांनी लगावलाय.
“त्यांच्या आजोबांबद्दल माझ्या मनात फार आदर आहे. ज्यांना ज्यांनी त्यांचे आजोबा वाचलेत त्यांना इथल्या धर्म व्यवस्थेबद्दल काय मतं होती ते माहिती आहे. माझ्या मुखातून नवे वाद होऊ नये म्हणून मी काही बोलत नाही. मला या विषयी काहीच बोलायचं नाहीय आणि नवा वाद निर्माणही करायचा नाहीय,” असं आव्हाड यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकांबद्दल आणि साहित्याबद्दल बोलताना म्हटलंय.
“तुमची आणि शरद पवारांच्या राजकीय जीवनाची तुलनाही करु नका,” असा सल्लाही आव्हाडांनी राज यांना दिलाय. “शरद पवार असे आहेत, तसे आहेत असं तुम्ही म्हणता. ते जातीयवादी आहेत असं म्हणता. ते काहीतरी सभेमध्ये बोलले की ते पुरंदरेंचा ब्राह्मण होते म्हणून ते द्वेष करत होते. मग कुसुमाग्रज पण ब्राह्मण होते,” असं म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंनी केलेला आरोप खोडून काढला.
तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी शरद पवारांचं कॅन्सरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीसंदर्भात माहिती दिली. “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं. त्यानंतर अगदी कंम्पाउण्ड म्हणून त्यांची ज्यांनी सेवा केली. जे त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत, विमानात त्यांच्यासोबत, हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत होते त्या डॉक्टरांचं नाव आहे रवी बापटय आता मी त्यांची जात सांगायची का? असे जातीवरुन मित्र ठरतात का? हे काय बोलतोय आपण कशावर बोलतोय आपण,” असं म्हणत आव्हाड यांनी राज यांच्या जातीयवादाच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply