बारदाना गोदामाला आग, लाखो रुपयांचा बारदाना जळून खाक

नागपूर : २ मे – नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी येथील औद्योगिक परिसरात असलेल्या इंडोरामा गेट नंबर चार समोरील बारदाना गोदामाला आग लागली होती. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात बारदाना जळून राख झाला आहे.
बारदाना गोदामात लागलेल्या आगीचे लोण शेडच्या बाहेर येत होते. त्यामुळे दूरपर्यंत आग दिसत होती. त्यावरून आगीची तीव्रता लक्षात येते. रविवारी (दि. 1 मे) दुपारीही याच गोडाऊनला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले होते. सोमवारी (दि. 2 मे) पहाटे पुन्हा आग भडकल्याने गोदामातील लाखो रुपयांचा बारदाना जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसून बुटीबोरी अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियत्रंण मिळवले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली असून आग इतर कारखानेपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मागील काही दिवसांपासून नागपूरमध्ये तापमान प्रचंड वाढले आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनाही वाढत आहे. मार्च महिन्यात दोन बस जळल्यानंतर गेल्या महिन्यात दोन दुचाकीही पेटल्याचीही घटना घडली. शनिवारी (दि. 30 एप्रिल) एक अगरबत्ती तयार करण्याचा कारखाना जळून राख झाला आहे.

Leave a Reply