देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू – दिलीप वळसे पाटील

मुंबई : २ मे – देशात जाणीवपूर्वक धृवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जनतेनं शांतता राखावी. आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, राज्यातल्या जनतेनं निर्धास्त राहावं, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करू नये, ती अबाधित राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. असे सांगत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण प्रक्षोभक असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वधर्मियांवर परिणाम होतील. राज ठाकरे सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल यावेळी गृहमंत्र्यांनी केलाय. ते म्हणाले, राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर संवेदनशील भागांसाठी विशेष सूचना गृह मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून कारवाई करणार असल्याचे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसंच ईद सण असल्याने राज्यातील एकूण परिस्थितीची आढावा घेतला जाणार आहे. अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली
कुणीकुणासोबत बोलावं हे मनसे-भाजपनं वाटून घेतलंय
राज ठाकरे शरद पवारांबद्दल बोलतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात, त्यामुळे कुणीकुणासोबत बोलावं हे मनसे-भाजपनं वाटून घेतलंय. असं गृहमंत्री वळसे-पाटील एबीपी माझासोबत बोलताना म्हणाले.
औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत.

Leave a Reply