जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या चालत्या कारवर अचानक आदळला हायमास्ट

वर्धा : २ मे – चालत्या कारवर अचानक हायमास्ट आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेल्यांचे प्राण वाचले. वर्ध्यात ही घटना घडली. सुदैवाने कारमध्ये असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी सुखरुप बचावलेत. वर्धेच्या सावंगी मेघे येथील टी-पॉईंटजवळ ही घटना घडली
वर्धा परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ आलं. याचदरम्यान वर्धेचे पालकमंत्री यांचा जनता दरबार संपवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे पत्नीसह कारने अमरावतीला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात होते. दरम्यान, सावंगी येथील टी-पॉईंट भागात हायमास्ट अचानक कारच्या दर्शनी भागावर आदळला. हायमास्ट आदळताच कार थांबली. सुदैवाने यात इंगळे आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली नाही. पण, ही घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.
या घटनेनंतर वर्धा सावंगी मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. जवळपास पन्नास फूट उंच असलेला हायमस्ट लाईट कोसळताना अनेकांनी पाहिले. घटनेनंतर काही वेळ पाहणारे नागरिक स्तब्ध तर घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेत सुखरूप वाचलेल्या कृषी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला पाहून नागरीकही ‘देव तारी त्याला कोण मारी’, असंच म्हणताना दिसले.
चौक, रस्त्यांवर प्रकाश राहण्यासाठी मोठे उंच हायमास्ट उभारण्यात आलेत. त्यावर लाईट लावण्यात आलेत. पण, अशा वादळात हायमास्ट सुरक्षित आहेत काय, असा प्रश्न निर्माण होतोय. या हायमास्टला लावलेले नटबोल्ट गंज लागलेले दिसतायेत. त्यामुळे याची देखभाल कोण करणार आणि अशी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार असणार, असा प्रश्न उपस्थित होतोय.

Leave a Reply