संपादकीय संवाद – मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा

एक दिवस दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस नक्की विराजमान होईल, असा विश्वास महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बोलतांना व्यक्त केला आहे. देवेंद्रजींचा हा विश्वास फाजील आत्मविश्वास निश्चितच नाही, त्यामुळे हा दिवस लवकरात लवकर यावा, यासाठी पंचनामातर्फे समस्त मराठीजनांना हार्दिक शुभेच्छा.
इतिहासातील नोंदीनुसार दिल्ली ही राजधानी म्हणून मुस्लिमांनी वसवली, या राजधानीवर कब्जा करण्याचे प्रयत्न मराठी साम्राज्याचे कर्तेधर्ते असलेल्या पेशवेंनी त्यावेळी केले, मात्र पेशवे या कामात यशस्वी झाले नाही. नंतर अनेक वर्ष इंग्रजांचेच राज्य होते, स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मराठी नेते पंतप्रधान पदासाठी निश्चितच लायक होते, मात्र उत्तर आणि दक्षिण या वादात मराठी माणसाला ही संधी मिळू शकली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे नाव भावी पंतप्रधान म्हणून काही काळ घेतले गेले, त्यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले गेलेले शरद पवार यांनी पंतप्रधान होता यावे म्हणून १९९१ साली सरळ सरळ दंडच थोपटले होते, मात्र आजवर दक्षिणेला संधी मिळाली नाही. म्हणून नरसिंहरावांना संधी द्यावी असे ठरले आणि पवारांचा पत्ता कापला गेला.
भारतीय जनता पक्षातील स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे दोन्ही नेते पंतप्रधानपदासाठी लायक मानले जात होते, जर महाजनांचे दुर्दैवी निधन झाले नसते, तर अडवाणींनंतर त्यांचाच नंबर होता. मात्र तसे व्हायचे नव्हते. त्यानंतर देशातील सर्वात मोठा आणि सत्तेचा दावेदार असलेला पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची संधी नितीन जयराम गडकरी या मराठी माणसाला मिळाली. त्यावेळी त्यांचेही नाव देशाचे भावी पंतप्रधान म्हणून घेतले जात होते. अजूनही गडकरी या शर्यतीतून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या रूपाने पहिला मराठी पंतप्रधान दिल्लीत विराजमान होऊ शकतो. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस ही मराठी व्यक्तीदेखील पंतप्रधानपदी विराजमान झालेली बघण्याचे भाग्य मराठी माणसाला मिळू शकते.
१९९१ साली शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी उघड प्रयत्न केले होते, त्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते, १९९६ साली लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना संधी मिळावी होती, हीदेखील पंतप्रधानपदाची पाऊलवाट असेच मानले जात होते. १९९८ मध्ये सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या झाल्या, त्यामुळे पवार विरोधी पक्षनेतेपदावरून बाजूला झाले, तरीही त्यांचे महत्व कमी झालेले नव्हते मात्र १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि तिथूनच ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेत फेकले गेले. जर ते काँग्रेसमध्ये राहते तर २००४ मध्ये पंतप्रधानपदी त्यांचा नंबर लागू शकला असता.
आता शरद पवार शर्यतीतून पुरते बाहेर फेकले गेले आहेत ,तर भाजपची सध्याची परिस्थिती बघता नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीस यांचा नंबर पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी लागू शकतो. दोघांपैकी कुणीही झाला, तरी मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे, त्यासाठी पंचमनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा……

अविनाश पाठक

Leave a Reply