जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारली लष्करप्रमुख पदाची सूत्रे

नवी दिल्ली : १ मे – जनरल मनोज पांडे यांनी २९ वे लष्करप्रमुख म्हणून शनिवारी सूत्रे स्वीकारली. सेवानिवृत्त झालेले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या जागी ते आले आहेत. आतापर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले जनरल पांडे हे लष्कराचे नेतृत्व करणारे अभियांत्रिकी शाखेतील (कॉर्प्स ऑफ इंजिनीयर्स) पहिले अधिकारी ठरले आहेत.
१ फेब्रवारीला लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी जनरल पांडे हे सिक्कीम व अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या ईस्टर्न आर्मी कमांडचे नेतृत्व करत होते. चीन व पाकिस्तानलगतच्या सीमेवरील आव्हानांसह भारताला असंख्य सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करावा लागत असताना जनरल पांडे यांनी लष्कराची धुरा स्वीकारली आहे. लष्करप्रमुख म्हणून, ‘थिएटर कमांड्स’ सुरू करण्याच्या सरकारच्या योजनेबाबत त्यांना नौदल आणि हवाई दल यांच्याशी समन्वयही साधावा लागणार आहे.
आपल्या उल्लेखनीय कारकीर्दीत जनरल पांडे यांनी अंदमान व निकोबार कमांडचे प्रमुख कमांडर म्हणूनही काम पाहिले आहे. तिन्ही सेवा एकत्रित असलेले हे देशातील एकमेव कमांड आहे. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले जनरल पांडे हे डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीयर्स (दि बॉम्बे सॅपर्स) मध्ये रुजू झाले होते. सर्व प्रकारच्या भूप्रदेशात अनेक प्रतिष्ठित कमांडमध्ये पारंपरिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासह घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

Leave a Reply