अगरबत्ती कंपनीला भीषण आग

हिंगणा : १ मे – हिंगणा तालुक्यातील नागलवाडी शिवारात रॉकेट अगरबत्ती कंपनीला पहाटे ३ वाजता लागलेल्या आगीत मशीन, कच्चा माल, तयार अगरबत्तीसह साहित्य खाक झाले. आगीत ३०,००० चौरस फूट शेडसह लाखोंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
शनिवारी पहाटे लागलेली आग दुपारी काहीशी नियंत्रणात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. नागलवाडी गावालगत सुमारे दोन एकर जागेत सलीम खान यांच्या मालकीची रॉकेट अगरबत्ती कंपनी आहे. शनिवारी पहाटे सुरक्षा रक्षकाला मागील गोदामात आग लागल्याचे दिसले. रात्रपाळी बंद असल्याने तिथे कुणीही नव्हते. सुरक्षारक्षकाने याची माहिती कंपनी मालक व अग्निशमन दलाला दिली. काही वेळातच नागरिकही पोहचले. एमआयडीसी, नागपूर महानगरपालिका व वाडी येथून ५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वाडीचे ठाणेदार प्रदीप रायनावार ताफ्यासह दाखल झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. पण सायंकाळ पर्यंत पूर्ण विझली नव्ह्ती.
या कारखान्यात दोन शेड आहेत. त्यापैकी मोठ्या ३० हजार चौरस फुट भागातील असलेल्या शेडमध्ये ही आग लागली. यात कच्चा माल, मशीन व काही पक्का माल तसेच शेड पूर्ण जळाले. लाखोंच्या घरात हे नुकसान असल्याचे घटनास्थळी दाखल वाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply