गुरू-शुक्र महायुतीचे उद्या पहाटे दर्शन

जळगाव, ३० एप्रिल – सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आणि सर्वात तेजस्वी दिसणारा शुक्र हे एकमेकांच्या अगदी जवळ आले असून, त्यांच्या या महायुतीचा अद्भूत नजारा १ मेच्या पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपासून दिसणार आहे. येथील खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी सांगितले की, गुरू आणि शुक्र हे दरवर्षी जवळ येतात; पण यावेळी ते एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. साध्या डोळय़ांनी तर ते दिसतीलच; पण दुर्बिणीतून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शुक्र यांना एकाच वेळी बघता येणार आहे.ज्यावेळी दोन ग्रह किंवा चंद्र आणि ग्रह एकमेकांच्या जवळ येतात, त्याला ‘युती’ म्हणतात; पण महायुतीत ते खूपच जवळ आलेले म्हणजे एकमेकांना चिकटल्यासारखे वाटतात. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती वेगवेगळय़ा अंतरांवरून आणि वेगवेगळय़ा वेगाने फिरत असल्याने त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळा काळ लागतो. उदा. गुरू ग्रह सूर्याभोवती सरासरी ७६ कोटी किलोमीटर अंतरावरून १३ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने फिरतो. त्यामुळे त्याला आपली एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास १२ वर्षे लागतात. शुक्र ग्रह सूर्याभोवती सरासरी १० कोटी किलोमीटर अंतरावरून ३५ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने फिरतो. त्यामुळे त्याला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २२५ दिवस लागतात. शुक्र हा गुरुच्या मानाने सूर्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग जास्त असल्याने शुक्र गुरुला पार करून पुढे जातो. या पार करण्याच्या वेळी पृथ्वी, शुक्र आणि गुरु एका सरळ रेषेत येतात. आपण त्यांना पृथ्वीवरून बघत असल्याने ते आपल्याला एकमेकांच्या जवळ आले आहेत, असा भास होतो.

Leave a Reply