अजितदादा आणि वळसे पाटील पोहोचले गडकरींच्या दारी, केली बंदद्वार चर्चा

नागपूर, ३० एप्रिल- नागपुरातील पोलिस भवनाच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. गडकरींच्या निवासस्थानी जाऊन ते भेटले. यावेळी अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुखही उपस्थित होते.
उपराजधानीतील पोलिस भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या गाठीभेटींनी राजकीय चर्चा जोरात आहेत. विशेष म्हणजे ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे या वेळी उपस्थित होते. याशिवाय अन्य कुणालाही या ‘बंदद्वार’ चर्चेत प्रवेश नव्हता.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसची २०१७ सालची ऑफर फेटाळल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितल्यापासून राज्यात नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पोलिस भवनाच्या नव्या वास्तूच्या उद्‌घाटन समारंभाला गडकरी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत फडणवीस यांचे नाव सर्वांत शेवटी छापणे हा अपमान असल्याचे कारण देत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या कार्यक्रमादरम्यान गडकरी हे तेलंगणच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीकडे असणाऱ्या खात्यांच्या कार्यक्रमांना नितीन गडकरी यांना प्रमुख पाहुणे वा अध्यक्ष म्हणून आवर्जून आमंत्रित करण्यात येत आहे.
सावनेर येथील पोलिस विभागाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार आणि वळसे पाटील हे नागपुरात आले असता त्यांनी थेट वर्धा मार्गावरील गडकरींचे निवासस्थान गाठले. हा नियोजित कार्यक्रम नव्हता. सलील देशमुख हे सोबत असल्याने चर्चेत अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईचा विषय आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे अर्धा तास ही चर्चा चालल्याचे समजते.

Leave a Reply