योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केले -संजय राऊत

मुंबई, २९ एप्रिल – शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशामधील योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं आहे असं म्हटलंय. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय.
“उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. मला असे वाटते की, महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भोंग्यांचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. “भोंग्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांना सरकारने चर्चेसाठी बोलवलं होतं. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांना सरकारने बोलावलं होतं. सर्व मिळून निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं. मात्र या बैठकीवर भाजपाने बहिष्कार टाकला,” असं संजय राऊत म्हणालेत.
पुढे बोलताना राऊत यांनी भाजपाने बैठकीला अनुपस्थित राहून या मुद्द्यावरुन राजकारण करायचं असल्याचं स्पष्ट केलंय असा टोलाही लगावलाय. “तुम्हाला राजकारण करायचंय, अशांतात निर्माण करायची. लोकांची दिशाभूल करायचीय,” असं राऊत यांनी भाजपाला सुनावलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल तर भूमिका ही राष्ट्रीय स्तरावर हवी, असंही राऊत म्हणाले. तसेच, योगी सरकारचा निर्णय महत्वपूर्ण आहे असं सांगताना, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय तर आपण सर्व त्याचं पालन करु, असंही राऊत म्हणाले आहेत.
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलेलं. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते. यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.

Leave a Reply