मोडक्या इमारतीत सापडला जळालेला मृतदेह

नागपूर : २९ एप्रिल – शहरातील जुना उंटखाना पसिरातील एका मोडक्या इमारतीमध्ये पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांना हत्येचा संशय आहे. परिणामी, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पटेल नावाच्या एका व्यक्तीची जुना उंटखाना परिसरातील ट्रिलेनियम मॉलच्या पुढे जुनी पडकी इमारत आहे. ही जागा १0 वर्षांपूर्वी ही जागा वर्धेच्या एका सचिन अग्नीहोत्री नावाच्या व्यक्तीने घेतली होती. तेव्हापासून या जागेची देखभाल आणि दुरुस्ती ही त्यांचीच होती.
दरम्यान, या ठिकाणी असलेली इमारत ही अनेक वर्षांपासून बंद आहे. शिवाय अवतीभवती कुंपण असल्याने आतमध्ये कोणीही येत जाऊ शकत नाही. परंतु, मागील काही दिवसांपासून या परिसरात भयंकर दुर्गंधी पसरली. कशाची ही दुर्गंधी ही कुणालाही कळायला मार्ग नव्हता. अशातच काही स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी जाऊन बघितले. येथे नागरिकांना एका इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला.
हा मृतदेह कुजलेला असल्यामुळे त्यातून दुर्गंधी पसरली होती. मृतदेहाच्या बाजूला एक नाश्त्याची प्लेट आणि चप्पल पडलेली होती. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविला.

Leave a Reply