भोंग्यावर पंतप्रधानांच्या जुन्या भाषणांचे ऑडिओ ऐकवत राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

नागपूर : २८ एप्रिल – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात अनोखं आंदोलन केलं. ‘लाव रे तो ऑडिओ’ या पद्धतीचं हे अभिनव आंदोलन होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरासंदर्भात नागपूरच्या शंकरनगर चौकात भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणातले ‘पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले की नाही झाले,’ या वाक्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसने करुन दिली
विशेष म्हणजे शंकरनगर चौक हे नागपुरातील एक व्यस्त चौक असून नागपुरातील सर्वात मोठ्या पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप शंकरनगर चौकात आहे. त्याच पेट्रोल पंपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीत इंधनाच्या दरावरुन काही राज्यांची यादी करुन सुनावलं होतं. राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच देशहितासाठी व्हॅट कमी करण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांचे जुने ऑडिओ लावत नागपुरात अनोखं आंदोलन केलं.

Leave a Reply