संपादकीय संवाद – निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांकांना सहिष्णुता शिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा

भारतात अल्पसंख्यांकांबद्दल द्वेषभावना वाढत असल्याची तक्रार करत देशातील १०८ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असल्याची बातमी आली आहे. ही बातमी किती खरी किती खोटी याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यामध्ये एक दरी निर्माण होते आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
अशी दरी निर्माण होत असल्याची तक्रार करणारे सर्व सनदी अधिकारी देशातील सुबुद्ध आणि सुजाण नागरिक म्हणून ओळखले जातात. या मंडळींनी अशी द्वेषभावना का वाढते आहे? आणि ही द्वेषभावना किंवा अशी निर्माण होणारी दरी कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत? याबाबतही सरकारला काही उपाय योजना सुचवायला हव्या होत्या. त्याचबरोबर असे का घडते? याची करणमीमांसाही करायला हवी होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख जमाती होत्या. त्यातील हिंदूंसाठी हिंदुस्थान म्हणजेच भारत आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान अशी रचना करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेता हिंदूंनी भारतात तर मुस्लिमांनी पाकिस्तानात राहणे अपेक्षित होते. मात्र आपल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी अनेक मुस्लिमांनाही इथेच ठेऊन घेतले. इथे राहायलाही हरकत नव्हती मात्र त्यांना अकारण अतिरिक्त सवलती दिल्या गेल्या. त्या बदल्यात या मुस्लिमांकडून तत्कालीन राज्यकर्त्यांनी एकगठ्ठा मते घेतली. परिणामी हे अल्पसंख्यांक शिरजोर बनत बहुसंख्यांकांवर जोरजबरदस्ती करू लागले. इथेही बेकायदेशीर काम केल्यानंतरही या अल्पसंख्यांकांना कायद्याचे संरक्षण मिळत होते, त्यामुळे बहुसंख्यांक दुखावले जात होते. परस्परांमध्ये दरी निर्माण होण्यामागे हे खरे कारण होते.
मात्र देशातील हे १०८ निवृत्त विद्वान या बाबीचा विचार करतांना दिसत नाही. या देशात सर्वधर्मियांसाठी सामान कायदा असावा असा आग्रह हे निवृत्त विद्वान धरत नाही. त्यामुळे साहजिकच बहुसंख्यांकांच्या मनात या अल्पसंख्यांकांबद्दल संताप वाढीला लागतो. या निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी अश्या तक्रारी करण्यापेक्षा अल्पसंख्यांकानाही तुम्ही कुठे चुकता हे समजावून सांगण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. असे झाले तरच देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. बहुसंख्येने असलेला हिंदू समाज हा सहिष्णू समाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या हक्कांवर जर कुणी गदा आणली नाही तर तो अकारण इतरांशी आकसाने वागत नाही. ही जाणीव टीकाकारांनी ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply