जयंत पाटलांनी पहिल्यांदा शरद पवारांना हिमालयात जाण्याबाबत विचारावे – चंद्रकांत पाटील

पुणे : २७ एप्रिल – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला, राष्ट्रवादीची संकल्प सभा, राणा दाम्पत्याच्या भूमिकेवर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले आहेत, याला जबाबदार ठाकरे सरकार असल्याचे सांगत त्यांनी आरोप केले आहेत. आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शनिवारी कोल्हापुरात संकल्प सभा पार पडली, या सभेबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माझ्यावर बोलल्याशिवाय तुम्ही भाषण दाखवत नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझ्यावर बोलावे लागेल, जयंत पाटील अजित दादांना हिमालयात सोडायला जातो असं म्हणतात, पण पवारांनी काँग्रेस सोबत जाण्यापेक्षा तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन असं म्हटलं होतं, याचा मात्र त्यांना विसर पडला आहे. यावर जयंत पाटलांनी पहिल्यांदा शरद पवारांना हिमालयात जाण्याबाबत विचारावं असं पाटील म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाटील म्हणाले, CISF चे पोलीस उपस्थित असताना हल्ला कसा झाला? याची व्यवस्थित दखल केंद्राच्या गृहखात्याने घेतली आहे. तसेच महाराष्ट्राचे पोलीस बघ्याची भूमिका घेत होते का? त्याची दखल गृह खात्याने घेतली आहे, राणा दाम्पत्यांसोबत पोलिसांच्या वागणुकीप्रकरणी देखील लोकसभा अध्यक्षांनी दखल घेतली आहे असे पाटील म्हणाले. सोमय्यांची जखम मोठी की किरकोळ यावर गुन्ह्याचा कलम ठरत नाही, तर त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जखम किती मोठी यापेक्षा हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही निशाणा साधला आहे, ते म्हणाले सरकारी यंत्रणेतून आलेला थकवा चिडचिड संपून एखाद्याने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर चांगलीच गोष्ट आहे
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, गल्लीतल्या मारामार्याप्रमाणे राज्यात सुरू आहे, आदी महाराष्ट्राचा बिहार, बंगाल करायचा आहे का? असं म्हटलं जात होतं. आता महाराष्ट्र करायचा आहे का? असे उदाहरण इतर राज्यांना दिले जाईल, तुम्ही हाताची घडी घालून बसले आहात आणि सगळे केंद्राकडे नाव ढकलत आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबवणं सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. उद्धवजींनी प्रोऍक्टिव झालं पाहिजे. शिवराळ भाषा तुमची कशी असू शकते? त्यासाठी अडगळीत पडलेले आहेत ना? मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची एक आचारसंहिता ठरवली पाहिजे असे पाटील म्हणाले.
संजय राऊत यांनी आमच्यावर आरोप करावेत इतके ते मोठे झालेले नाहीत. तसेच नवनीत राणा या आमच्या खासदार नाही, त्यांचं समर्थन केलं नाही, तर त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असं पाटील म्हणाले. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI आणि ED कडून चौकशी सुरू आहे. आवश्यकता पडल्यास या दोन्ही यंत्रणां चांदीवाल कमिशनची मदत घेतील. गृहविभागात आलबेल नाही असं म्हटलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सवाल उपस्थित केला आहे. यावर पाटील म्हणाले, अब्दुल सत्तार यांचे म्हणणे कोणीही गंभीररित्या घेत नाही, त्यांचं बोलणं हातवारे सगळेच मजेशीर असतं
एक कोटी वीस लाख सदस्य असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाला निवडणुकी दिवशी फिरत असताना ज्या पद्धतीने बाहेर काढलं गेलं. त्या शहरात मला 78 हजार मते मिळाली आहेत. 40 हजार मते मिळाली असती तर माझ्या घरावर दगड मारले असते ही वस्तुस्थिती आहे. वेगळ लढल्यानंतर राष्ट्रवादीला आठ हजार मते मिळाली होती. आता ही तुमचे दोनच आमदार आहेत, तेही काठावर आहेत. अपक्ष समरजित घाटगे यांनी 90 हजार मते मिळाली, कशाच्या जीवावर तुम्ही उड्या मारता? हा तुमचा पराभव आहे असे सांगत पाटलांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय.

Leave a Reply