सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

हनुमान चालीसा ते महाराष्ट्र अस्मिता बेचिराख

“हनुमान चालीसा” राणा दांपत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पाऊल उचलले आणि त्याचे पडसाद राणा दांपत्याची अटक आणि सोमैया ह्यांच्या गाडीवर दगडफेक होवून रात्र संपली. मध्यंतरी च्या काळात “हनुमान चालीसा” मातोश्रीवर होवू नये म्हणून विविध प्रतिक्रिया उमटल्या. वरपांगी छोटे से दिसणारे चॅलेंज उग्र स्वरूप धारण करीत आहे. एकतर्फी राजकीय शक्ती आपली राजकीय पोळी शेकण्याची चाल सफल होत आहे हे दिसून येत आहे. ज्या शक्तीने वाघाला वेसण घातली, वाघाला मातोश्रीत बंदिस्त केले, ज्या शक्तीने वाघाची गुर्मी उतरवून टाकली. ज्या शक्तीने वाघाला घायाळ करुन घायकुतीला आणले आणि जेरीस आणले त्या पक्षप्रमुख हिंदुत्ववादी शिवसेनेच्या हिंदू “हनुमान चालीसा” ला मातोश्रीवर म्हणण्यास विरोध करण्याला भाग पाडले अशी बजरंगी शक्ती जी शिवसेनेला भारी पडली ती शक्ती म्हणजे “मै समय हूं!”
घड्याळाची किमया न्यारी! हिंदू ला जाती जाती मध्ये वाटा – आपापसात लढवा. त्याप्रमाणे जातीयवादी उमेदवार उभे करा, कधी पावसात भिजा आणि कसे ही करुन सत्ता हस्तगत करा किंवा सत्तेत सहभागी व्हा. एवढे छोटेसे महाराष्ट्राबाहेर न जाणारे राजकारण. समयाधीशांना चिंता नाही सामान्य जनांची. त्यांना चिंता फक्त आपले नाव वाचविण्याची आणि लिप्त भ्रष्टाचारात नाव गुप्त ठेवण्याची. मग त्यासाठी वाट्टेल ते! मग त्यापोटी जनतेचा बळी गेला तरी चालेल, अनिल देशमुख चा बळी गेला तरी चालेल. पण आपले नाव सुखरूप भ्रष्टाचार यादीबाहेर स्वच्छ पाहिजे त्यासाठी सारा अट्टाहास. भले ही मग त्यामध्ये कितीही बळी पडोत. सर्वसामान्य जनता भरडली जावो. सर्वसामान्य जनतेचा पैसा धोक्याने हडपून स्वतः साठी वापरून, सत्तेचा वापर करीत – सर्वसामान्य जनतेविरूद्ध वापरून परत सत्तेत येणे – ही आजकाल रूढ झालेली “लोकशाही” ची परिभाषा. परिस्थिती नुरूप बदलली असली तरी वास्तवापासून दूर नक्कीच नाही.
मनसे प्रमुख राज ठाकरे अचानक झोपी गेलेला जागा झाला. असे ऐकिवात आहे की स्पॉन्सर केले की हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा पुतण्या तुम्हाला हवे तसे भाषण ठोकतात. समयाधीशांवर जातीवादाचे भर सभेत जोडे मारले आणि महाराष्ट्र राजकारणात जातीवादी रंग भरला. त्याचे पडसाद आठवड्याभरात दिसायला लागले. जाती जाती चे धृवीकरण व्हायला लागले. आव्हाडांनी आपल्याला हनुमान चालीसा कंठस्थ आहे हा फसवा प्रयोग केला. राऊत साहेब ह्या पुढे जाऊन “मारुती स्तोत्राला ” हनुमान चालीसा म्हणून कसे मुखोद्गत आहे हे दाखवायला गेले आणि आपण किती खोटे बोलतो जनतेशी, हे सांगण्यात यशस्वी झालेत. आताशा सरकारी कुठल्याही पदावर नसल्याने राऊतांना काही कामधंदा नसल्याने त्यांच्या पत्रकार परिषदा सुद्धा वाढल्या आहेत. प्रातर्विधी पत्रकार परिषदा पासून ते शुभरात्री पत्रकार परिषदा ते करीत आहेत. सत्तेचा माज, सत्तेचा दुरुपयोग आणि आतापर्यंत तोंडात बसलेली शिवराळ भाषेची आगपाखड विरोधी पक्षावर कशी करायची ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संजय राऊत. हिंदुत्व आमच्या रगारगात आहे हे सांगताना “हनुमान चालीसा” ला विरोध करायचा. भाजपा ने आम्हाला हिंदुत्व शिकवु नये हे सांगताना नवाब मलिक सारख्या नेत्याचे समर्थन करायचे. की ज्याचे संबंध दावूद सारख्या आतंकवाद्याशी जुळतात. हो! दावूद “आतंकवादी” भारतीय नागरिकांचे प्राण घेण्याचे षडयंत्र म्हणजे आतंकवादी भ्याड हल्ला. ही जात जमात भारताला खच्ची करण्यासाठी हजार वर्षांपासून लागली आहे पण अजून भारताचे इस्लामीकरण होत नाही ही त्यांची दुखती रग आहे. पण अशा नवाब मलिक चे समर्थन संजय राऊत करतील हे अपेक्षित नव्हते. संजय राऊत ह्यांची कथनी आणि करणी एकदम परस्पर विरोधी आहे. आपण म्हणतो की “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले” ह्या धर्तीवर संजय राऊत कुठे स्टॅंड होत नाही. अशा परिस्थितीत त्यांचे “खोटं बोल रेटून” चालू आहे. राउत साहेब “अंदर क्या है बाहर क्या है – ये सब कुछ पहचानती है – ये जो पब्लिक है” !
अमोल मिटकरी – ह्याने तर कहर केला. ब्राम्हणावर सरळ सरळ हल्ला केला. नसलेले मंत्र ब्राम्हणांच्या तोंडी घालून जाती जाती मधली तेढ वाढविली. आता राजकारण बघा. दोन चार मंत्र पाठ करून त्याचा अर्थ समजावून अनर्थ करायचा असेल तर राष्ट्रवादी सारखा अराजक माजविणारा दुसरा पक्ष नाही. जयंत पाटील, धनंजय मुंडे ज्या पद्धतीने हासत होते आणि ब्राम्हण समाजाची खिल्ली उडवीत होते. ते पाहून खरोखर हे लोकप्रतिनिधी कोणी निवडून दिले आहेत? त्या जनता जनार्दनाच्या चारित्र्यावर संशय यावा. धनंजय मुंडे हा तर एकपत्नी + दोन रखेलीं व्रताचा एकमेव दादला. आता ह्याने संबंध बनविण्याच्या प्रक्रियेत “भार्या समर्पयामि केली की मम् रखेली समर्पयामि” केली हा वादाचा विषय असू शकतो. मात्र एका भाषणात भाऊ तोरसेकर जे म्हणाले की “ब्राम्हण समाजात आपला जन्म झाला नाही. अशा लोकांना वाईट वाटते की आपला जन्म ब्राह्मण समाजात झाला नाही. मग ह्या वैषम्यातून ब्राह्मण विरोधी वैफल्यग्रस्त अशी विधानं ही मंडळी करीत असतात”. भाऊ तोरसेकर आपले म्हणणे नाकारता येण्यासारखे नाही. ब्राम्हण समाजात जन्मलेल्या ब्राम्हण वर्गानी ब्राह्मण असल्याचा सार्थ अभिमान निश्चित पणे बाळगायला हवा नी इतर समाजाला बळी न पडता आपले ब्राम्हणत्व जपायला हवे.
दैवाधीनं जगत्सर्वं मन्त्राधीनं तु दैवतम्,
ते मंत्र ब्राम्हणाधीनं ब्राम्हणा मम् दैवतम्! एवढे सामर्थ्य ब्राम्हण वर्गात असताना ब्राह्मण इतर समाजातील चालीरीती ना बळी पडतो आणि आपले ब्राम्हणत्व गमावतो. हे वैषम्य वाटते. ह्याचा अर्थ इतर समाजातील चालीरीती वाईट आहे अशातला भाग नाही. तो एक चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा भाग आहे. तर ब्राम्हण समाजाच्या चालीरीती, आहार, संस्कार, संस्कृती ह्या मर्यादित चाकोरीबद्ध जीवन जगावे लागते. ब्राम्हणत्व टिकवावे लागते. अर्थात “ब्राह्मण” महती गायली म्हणून ह्या लेखावर टिका होणार हे गृहीत धरून आहे. कारण आम्ही जातीपातीच्या क्षोभात, आमची प्रतिज्ञा “सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही रसातळाला विसरून जातो.
“शुद्धफळापोटी फळे रसाळ गोमटी” ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अंमलात आणला. “शुद्धफळापोटी” ह्याचा अर्थ त्यांना ब्राह्मण समाज अभिप्रेत आहे. ह्याचे कारण त्यांनी लग्न केले ते ब्राह्मण मुलीशी. आणि तसेच संकेत त्यांनी आपल्या समाजाला दिले आहेत. की आपला वंश चांगला, परिपक्व, संस्कारीत करायचा असेल तर ब्राह्मण मुलगी घरी आणा. प्रकाश आंबेडकर कोणाचा मुलगा? ब्राम्हण आई असणारा मुलगा. अमोल मिटकरी आणि तत्सम लोकप्रतिनिधी “ब्राह्मण समाजाची” खिल्ली उडवीत अप्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपमान करीत आहेत. धनंजय मुंडे आपल्या दोन रखेली सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा भ्रष्टाचार करीत, खिल्ली उडवीत आहेत. जयंत पाटील सारखे मोठे नेते भर सभेत हास्यकारात बुडून ह्या सर्वाला “संविधान विरोधी” अनुमोदन देत आहे. एकंदरीत भारतातील ब्राम्हण समाजाला “हनुमान चालीसा” चे नावाखाली जाती जाती मध्ये तेढ वाढविण्यात समयाधीशांचा डाव सफल होत आहे. एकदा ही तेढ परमोच्च शिखरावर गेली की कुठल्याही निवडणूकांसाठी ह्याचा उपयोग निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात येतो.
ब्राम्हणांविरोधी तेढ का? ह्याचा सखोल विचार कोणी ही करीत नाही ह्याचे वाईट वाटते. भारताची प्रगल्भ तत्कालीन शिक्षण पद्धती संपूर्ण पणे संस्कृत भाषेमध्ये. चातुर्वर्ण्य व्यवस्था पण कुठे ही भेदाभेद नाही. लागालग प्रस्थ नाही. सर्व वर्णव्यवस्था भारताचे रहाटगाडगे समर्थ पणे रामराज्य सुस्थितीत त्यावेळचा भारत. मेकॉले च्या म्हणण्यानुसार “भारतावर राज्य करायचे असेल तर ते अतिशय कठीण बाब आहे कारण इथे लोक नैतिकता, नितीमत्ता ला प्राधान्य देतात आणि ही मंडळी पापभीरू आहे. देवाला मानणारी आहे” मग येथील सर्वसमाजाला मार्गदर्शन करुन चातुर्वर्ण्य व्यवस्थेला समाधानी ठेवणारी “ब्राम्हण समाज” ही सर्व व्यवस्था सांभाळत आहेत. ज्यावेळी अखंड भारतात सात लाखाचे वर गुरुकुल होते त्यावेळी इंग्लंडमध्ये पहिल्या शाळेची स्थापना झाली. निती, नितीमत्ता, नैतिकता ही शिक्षण पद्धती रूढ आणि प्रचलित करणाऱ्या ब्राम्हणांना हळूहळू वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. इ.स. १८३५ मध्ये भारतात शिक्षणपद्धती ची भाषा आंग्ल करावी असा आदेश काढला आणि भारतीय संस्कृती ची पडझड सुरू झाली. भारतातील गुरुकुलाची भाषा “संस्कृत” आमचे वेद, भारतातील सर्व शिक्षण साहित्य संस्कृत मध्ये. आजतागायत जगामध्ये जितक्या भाषा आहेत त्या सर्व भाषांमध्ये काहीना काही त्रुटी आहेत. मात्र “नासा” ने संगणकीय भाषांमध्ये “संस्कृत” भाषेला सर्वोत्कृष्ट भाषा म्हणून प्राधान्य दिले आहे, सर्वोत्कृष्ट भाषेचा दर्जा दिला आहे. आम्ही त्यावेळी जगात सर्वतोपरी सर्वप्रगत समाज म्हणजे भारतीय संस्कृती होती. व्यापार आमचा सर्व जगात, निर्यात करण्याचा उत्तम दर्जाचा माल ही आमची वैशिष्ट्ये. पण संस्कृत भाषेला रद्दबातल करीत, भारताची संस्कृती चा बिमोड करण्यात इंग्रज सफल झाले. मंदिरांमध्ये इतर वर्णांना प्रवेश निषिद्ध करीत हळूहळू ब्राह्मणविरोधी राजकारण करीत ब्राम्हण द्वेषाची बीजं पेरली. हळूहळू ब्राह्मण विरोधी परंपरा कायम करीत, भारताला मूळ संस्कृती पासून विलग करीत ब्रिटिश संस्कृती कायम करण्याच्या प्रयत्नात ब्राह्मण समाजाचा अडसर, ब्राम्हण विरोधी परंपरा इतर धर्मियात रुजविली. स्वातंत्र्यानंतर हिंदू विरोधी कॉंग्रेस सरकारने सत्तर वर्षात हा अजेंडा भारतात रुजवला ब्राम्हण विरोधी, जाती जाती मध्ये रोष निर्माण करणारी संविधानातील व्यवस्था निरंतर पेट्रोल टाकून चेतवत ठेवली. राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थापोटी जातीयवादाचा उपयोग केला परिणामी आज कालचे हे कुत्र्याच्या छत्री सारखे होणारे अमोल मिटकरीसारखे भाषण. कुत्र्याची छत्री एवढ्यासाठी म्हणतोय की राजकीय परिस्थिती ची वेळ आली की जातीयवादाचा, अशा फालतू भाषणांचा उपयोग केला जातो. खरा इतिहास जाणून घ्यायची कोणालाही गरज नाही. केवळ स्वार्थी राजकारणासाठी स्वार्थी संदर्भ घ्यायचे, द्यायचे ठोकुन. भिकार टाकलेले दोन भाकरीचे तुकडे उचलणाऱ्या बातमी वाहिन्या आहेच, भ्रमित पत्रकारिता करायल. भारतातील हिंदू मग जाती जाती त बटला आणि संख्येने घटला. कुठे तो अखंड भारत नी कुठे आजचा खंडित लंबुळका भारत.
आजच्या घडीला आमचा जातीयवाद परमोच्च पदी विराजमान करण्याला कार्यरत आहोत आणि हाच् राकॉं चा अजेंडा आहे आणि त्यासाठी राज ठाकरेंच्या राकॉं विरोधी भाषणाचे प्रयोजन केले असावे असा एक आपला अंदाज. कारण त्यानंतर ज्या पद्धतीने बातम्या वाहिनींवर जाती जाती चे राजकारण सुरू झाले की शिवसेना सारख्या शुद्ध हिंदुत्ववादी पक्षाच्या मातोश्रीवर “हनुमान चालीसा” म्हणण्यास खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने मुख्यमंत्री पदावर राहून नकार द्यावा. एवढेच् नाही तर हिंदू धर्माला सर्वतोपरी मानणाऱ्या शिवसैनिकांनी देखील विरोध करावा हे खरे म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाचे दिवाळे निघाल्याचे द्योतक आहे. संजय राऊत यांनी देखील “हनुमान चालीसा” मातोश्रीवर जाऊन म्हणणे ह्याला मातोश्रीवर हल्ल्याचे रुप देऊन – अंधविश्वासी शिवसैनिकांना भडकाविले. राणा दांपत्याच्या मुंबई स्थित घरासमोर ५००-७०० चा जमावडा उभा करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का दिला, मातोश्रीवर जमलेल्या जमावड्याने “हनुमान चालीसा” विरोधात उभे ठाकुन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या हिंदुत्ववादी अस्मितेला काळिमा फासला, संजय राउतांनी गोवऱ्या वगैरे सारखी खुनी विधानं करून संपादकीय भाषेला, वृत्तीला, विश्वासाला कलंक लावला, मातोश्रीवर घरात बसलेला मुख्यमंत्री ह्यांनी राणा दांपत्यावर भ्याड पोलीसी कारवाई करून नपुंसक मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर लांछन लावले तर शिवसैनिकांनी किरीट सोमय्या ह्यांचे गाडीवर दगडफेक करीत जखमी करुन महाराष्ट्र राज्याची प्रतिमा बेचिराख केली. महाराष्ट्राच्या बेचिराख प्रतिमेवर कलंकित पत्थर आहे.

भाई देवघरे

Leave a Reply