रोजगाराच्या नावावर धुणीभांडी करणाऱ्या महिलांची केली फसवणूक

नागपूर : २५ एप्रिल – गरजू महिलांना रोजगार मिळवून देतो म्हणत अनेक महिलांकडून प्रत्येक ५00 रुपये घेणाऱ्या तुळशीगृह उद्योगाकडून या सर्व पैसे भरणाऱ्या महिलांची फसवणूक केली. धुणीभांडी करणाऱ्या महिलांनीही घरकाम झाल्यावर रिकाम्या वेळात रोजगार मिळेल, या आशेने पैसे भरले. परंतु, हा गृहउद्योग सुरूच झाला नाही. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना कमी वेतनात काम करण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत एका गृह उद्योगाने रोजगार मिळेल या असे सांगत अवती भवतीच्या परिसरात माहिती पसरवली. रोजगारात महिन्याला चांगले वेतन मिळेल अशा आशेने या उद्योजकावर विश्वास ठेवला. २३ सप्टेंबर २0२१ ते ७ एप्रिल २0२२ या दरम्यान यांच्यासह मोठय़ा संख्येत महिलांनी या तुळशीगृह उद्योगात ५00 रुपये भरले. या महिलांना १ जानेवारी २0२२ पासून रोजगार देण्याचे या गृह उद्योगाकडून सांगण्यात आले होते. या उद्योजकांच्या बोलण्यात येऊन अनेक धुणीभांडी करणाऱ्या वा तस्तम काम करणाऱ्या महिलांनी पैसे भरले. अनेक सेवानवृत्त, वयोवृद्धांनीही घरी बसल्याबसल्या काम मिळेल, वेळही निघेल आणि कामातही राहू, असे समजून आरोपी श्रद्धा मोझरकर, (वय ४२, रा. बुधवारी बाजारजवळ), नेहा जुवारे (वय ३२, रा. सोमवारी कॉटर) यांना पैसे दिले. तुळशी गृह उद्योगाच्या प्रोजेक्टमधून त्यांना रोजगार दिला जाणार होता. परंतु, रोजगाराची वेळ निघून गेल्यानंतर अनेक महिलांनी आरोपींकडे रोजगाराचा तगादा लावला. परंतु, कुठलाही रोजगार त्यांना देण्यात आला नाही. उलट या गोरगरीब महिलांकडून २ लाख रुपये जमा करून आरोपींनी या महिलांची फसवणूक केली. या प्रकरणी प्लॉट नंबर १४७ नाईकनगर, मानेवाडा रोड येथे राहणाऱ्या फिर्यादी सविता अरविंद शिंदे (वय ५0) यांनी थेट या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४२0, ५0६ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply