बकुळीची फुलं : भाग २६ – शुभांगी भडभडे

5 sep shubhangi bhadbhade

हाटे पहाटे मलकापूर आलं. रात्रभर झोप तशी लागलीच नव्हती . अनोळख्या घरात , अनोळख्या व्यक्तींबरोबर मी जाणार होते. स्टेशन आलं तसं सामान काढलं. आणि दारात येऊन उभं राहिलो . त्यात माझी एक वेणी बाकात अडकली. ती काही केल्या निघेना . मला वाटतं तिथूनच पुढचे अडचणीचे संकेत मिळाले होते .
अखेर “ह्यांच्या” ते लक्षात आलं . त्यांनी ती वेणी बाकातून काढली तेव्हा केस खुप तडतडले . डोळ्यात पाणी आलं . पण सांगणार कोणाला ?
स्टेशनवर उतरलो .आम्हाला घ्यायला कुणी येणार नव्हतंच . त्या स्टेशनवर केवळ आम्हीच उतरलो होतो . त्यावेळी ते लहानसं गाव होतं . मिणमिणते लाईट स्टेशनवर होते . पाच वाजता होते पण उन्हाळ्यातही अंधारल्या सारखं वातावरण होतं .
“कुठेतरी जवळपास पाऊस पडला असावा” सासूबाई म्हणाल्या .
“तुला सांगते , एकेकाळी साडे तीनशे एकर जमिन आणि सात वाडे होते आपले . आता आपण जाऊ तेवढाच वाडा राहिला आहे . शेती कुळकायद्यात गेली…..”
“मग वाड्यांचं काय झालं? ” हे मला विचारायचं होतं पण मी बोलले नाही.
स्टेशन बाहेर चार टांगे उभे होते . आजवर टांग्यात बसण्याची कल्पनाही कधी केली नव्हती . आम्ही गेलो तसं चारही टांगेवाले आमच्या जवळ आले .
कारण आम्हीच केवळ गाडीतून उतरणारे गि-हाईक होतो. सासूबाईंनीच भाव केला. आणि घासाघीस करून दोन टांगे ठरवले. साडेपाच वाजले होते पण अंधार होता म्हणून टांगे वाल्यांनी टांग्याचे दिवे लावले .
एका टांग्यात सासूबाई , मी, जाऊबाई , मोठे दीर बसले . दुस-या टांग्यात मावस दीर , हे आणि एक ओळखीचे कोणीतरी होते .
आज आकाश भर उन्हाळ्यात ढगाळलं होतं . पाऊस येईल की काय अशी स्थिती होती.
घोड्यांना इशारा करताच ते चालू लागले आणि घोड्यांची एकदम गती घेतली तीही वळणावर . मी पडता पडता सावरले. सासूबाई म्हणाल्या.
” ज्यांना टांग्यात बसून सावरता येतं त्याला संसार सांभाळता येतो . “
मला तर ह्या अशा वाक्यांचा अर्थच कळला नाही . एवढंच कळलं की, प्रत्येक क्षणी स्वतः ला सावरून असायला हवं , जागृत रहायला हवं .
पण एवढा का संसार भयावह आहे ?
टांगा धावत होता . घोड्यांना आज पहिली पहिली सवारी एंजॉय करायची इच्छा झाली दोन्हीही टांगे बरोबरीने धावत होते .
“अरे जरा धीराने घ्या” दीर म्हणाले .
मी तर घट्ट पकडून बसले तरी हलक्याशा वळणावरती तोल तर जाणार नाही असं मनात वाटत होतं . मेन रोड संपला आणि कच्च्या रस्त्याने टांगे जात होते . रस्ता अरुंद होता.
कोणत्याच घोड्याला आपण मागे राहावंसं वाटत नव्हतं. आणि एका वळणावर दोन्ही टांगे बाहेरच्या दिव्यामुळे एकात एक अडकले . आणि रॉकेलच्या आमच्या टांग्याच्या दिव्याने पेट घेतला .
दोन्ही टांगे अडकलेले , दिव्याने पेट घेतलेला . अशावेळी “हे” पटकन उतरले आणि हातांनी तो जळता दिवा काढून फेकला . हातातले भाजले असतीलच पण बोलले नाहीत .
आणि पुन्हा सुरू झाला घरापर्यंतचा प्रवास .
मोठ्ठ्या ऐसपैस वाड्याजवळ टांगे थांबले . सर्वांसह मी उतरले पण भितीने माझ्या पायात गोळे आले होते . अवघडत बसल्याने एक खांदाही दुखत होता. पण वाड्याच्या बाहेर सडा सन्मार्जन करून सुंदर रांगोळी काढली होती . दाराला तोरणं होती . आणि अंगणात रांगोळी होती .
वाड्यात शिरताच उजव्या बाजूला विहीर आणि विहीरीवर रहाट होता .
नागपूर पेक्षा मलकापूर गाव आणि गावातल्या वस्तीतल्या हा वाडा कथा कादंबरीत वर्णन करावा असा होता .
गेल्या गेल्या जाऊबाई म्हणाल्या .
मी स्नान आटोपून येते तूही कपडे घे . मी माझी लोखंडी पत्र्याचीपेटी उघडत असतांनाच बाहेरच्या खोलीत जमलेली अनेक माणसं होती . सासूबाईंनी टांग्याची
घटना सांगितली . कुणीतरी म्हणालं,
” मुलगी अपशकुनी दिसतेय . घरात पाऊल पडलं नाही तोच…”
“काही म्हणा ताई, मुलगी मुकुंदाला शोभणारी तर नाहीच नाही “
” खरंच ताई , काय बघितलंय मुलीत , ना रंग ना रूप ना उंची ना काही “
” मी भविष्य बघितलं मुकुंदाचं .गुणी आहे . संसाराला गुण लागतात , रूप सौंदर्य नाही . आणि मुकुंदापुढे ती डावी असली तरी चारचौघींसारखी आहेच . अपंग नाही , व्यंग नाही . सारंच मिळतं का ? “
“पण तरीही.. ” कुणीतरी आपला मुद्दा रेटायचा प्रयत्न करणार तोच सासूबाई म्हणाल्या
” आलेल्या सुनेचं आपण स्वागत करूया “
माझे डोळे नकळत भरून आले .
आम्ही दोघी स्वयंपाक घरात आलो तेव्हा . वातीचा मोठा स्टोव्ह पेटवून त्यावर मोठ्या पातेल्यात दुध तापत ठेवलं होतं आणि एका मोठ्या परातीत पीठ काढून ठेवलं होतं . तिखट मीठ सारं होतं . कांदे होते , कोथिंबीर होती .

माझं माहेरचं शैला नावच सर्व परिचित असल्याने सासूबाई म्हणाल्या
“शैला , तू थालीपीठ कर . हे सारं सामान काढून ठेवलंय आणि विजया अगोदर चहा करील . हा दुसरा स्टोव्ह ही ठेवला आहे . हे दोन तवे आहेत. ” त्या आम्हा दोघींना सूचना देऊन गेल्या
एवढी मोठी परात त्यात एवढं पीठ , मला काही कळेना , अंदाज येईना . माझ्या जावेच्या ते लक्षात आल्याने तिने भराभर त्यात सामान टाकलं आणि ती चहाकडे वळली . मी एवढं मोठं पीठ भिजवायचं आहे ह्या कल्पनेनी दडपले होते .
घरात पंचवीस तरी माणसं होती . आईने घरून दिलेला चिवडा आणि लाडूचा मोठा डबा होता . पण त्या बरोबर थालीपीठ द्यायची ही कल्पना सासूबाईंची होती . बोलू तर शकतच नव्हते . कसं बसं पीठ भिजवलं आणि तव्याला तेल लावून थालीपीठ थापलं आणि स्टोव्ह पेटवून त्यावर तवा ठेवला .
पहिलं थालीपीठ तुटलं म्हणजे अक्षरशः तुकडे झाले . दुसराही तसंच . तेवढ्यात माझे मावस दीर जे पुण्याला इंजिनीअरिंग ला होते ते म्हणाले ,
” वहिनी , तू चहाचं बघ मी मोठ्या वहिनीला सांगतो . “
नाती कशी पटकन् जमतात , आपलीशी होतात . याचा सुखद प्रत्यय आला.
जाऊबाई आली , आणि माझी सुटका झाली .
पण चहाचं एवढं मोठं पातेलं त्यात डबाभर चहा आणि मुठीमुठीने साखर घातलेली मी पाहिली होती . पण तो चहा गाळून कपात भरणं आणि नेऊन देणं मला काही केल्या शक्यच वाटतं नव्हतं . “अपशकुनी” ह्या शब्दानेच धसका घेतला होता . मावसदीराच्या ते लक्षात आलं होतं. ते मला मदत करायला म्हणून माझ्या जवळ आले म्हणाले.
” वहिनी , अपशकुनी असं काहीच नसतं . आणि कुणी असं म्हटलं ते त्यांच्या मनाची क्षूद्र भावना असते . आणि आपल्याला स्वतः ला सिद्ध करायची ही संधी आपल्याला मिळालेली असते.
मी ताटा ऐवजी ताटली घेतली. मी गाळून देतो चहा . ताटात कप ठेव . आणि सांभाळून ने.”
मी ताटली घेतली सहा कप ठेवले आणि सर्वात शेवटी “ह्यांना” चहा दिला . किंचित स्मितरेषा त्यांच्या चेहऱ्यावर दिसली .
आणि मी भारावून गेले .
आता पुढे……..

शुभांगी भडभडे नागपूर

Leave a Reply