पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल

पुणे : २५ एप्रिल – ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हृदयनाथ मंगेशकर हे भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे छोटे भाऊ आहेत. येत्या १०-१२ दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
नुकतंच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा पार पडला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ मंगेशकर यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी आदिनाथ मंगेशकर यांनी वडिल पं. हृदयनाथ मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
षण्मुखानंद सभागृहातील सत्कार समारंभात भाषण करताना हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ म्हणाले, “गेल्या कित्येक वर्षांपासून माझे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमाचे स्वागत भाषण देतात. त्यासोबत ते या ट्रस्टबद्दल माहितीही सांगतात. पण यावर्षी त्यांना हे करणं शक्य नाही. कारण त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवाच्या कृपेने ते येत्या ८-१० दिवसात घरी परततील. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणाही होत आहे, असेही आदिनाथ यांनी सांगितले. पंडित हृदयनाथ मंगेशकर हे ८४ वर्षांचे आहेत.

Leave a Reply