देशातून दहशतवाद हद्दपार करण्यासाठी सरकार कार्यरत – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

गुवाहाटी : २४ एप्रिल – सीमेपलीकडून आमच्या देशाला लक्ष्य बनवणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध त्या भूमीवर जाऊन कारवाई करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. देशातून दहशतवाद हद्दपार करण्यासाठी सरकार कार्यरत आहे, असे १९७१ सालच्या भारत- पाकिस्तान युद्धातील आसाममधील सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सिंह म्हणाले. ‘दहशतवादाचा कठोरपणे मुकाबला केला जाईल असा संदेश देण्यात भारत यशस्वी झाला आहे. सीमेपलीकडून आमच्या देशाला लक्ष्य करण्यात आले, तर सीमा ओलांडून जाण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही’, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
बांगलादेश हा आमचा मैत्रीपूर्ण शेजारी असल्यामुळे, पश्चिम सीमेवर जाणवणारा तणाव पूर्व सीमेवर दिसून येत नाही. घुसखोरीची समस्या जवळजवळ संपली आहे. पूर्व सीमेवर अधिक शांतता व स्थैर्य यांचा अनुभव भारताला येत आहे, असेही सिंह म्हणाले. ईशान्य भारतातील निरनिराळय़ा भागांतून सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (आफस्पा) मागे घेण्यात आल्याबद्दल सांगताना, एखाद्या ठिकाणची परिस्थिती सुधारली की सरकारने यापूर्वीही तसे केले असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.

Leave a Reply