संपादकीय संवाद – राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रात ढवळाढवळ करणेही बंद करावे

साहित्यिकांनी राज्यकर्ते आणि राजकारणी मंडळींच्या ओंजळीने पाणी पिऊ नये, असे आवाहन महाराष्ट्रातले जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे नेते शरद पवार यांनी उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन करतांना केले आहे. पवारांचे हे आवाहन चिंतनीय निश्चितच आहे. मात्र देशातील साहित्यिकांना अश्या प्रकारे राज्यकर्ते आणि राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय शरद पवार ज्या काँग्रेस पक्षात लहानाचे मोठे झाले, त्या पक्षानेच लावली आहे. आणि दस्तुरखुद्द शरद पवारही आजवर तेच करत आले आहेत हे नाकारता येत नाही.
साहित्यिक आणि कलावंतांना राजाश्रय देण्याची आपली जुनी परंपरा आहे. भारतात ही परंपरा बाबर अकबरासारख्या बादशहांनी जशी जपली तशीच शिवशाहीतही जपली गेली. त्यामुळे राज्यकर्त्यांनी साहित्यिक तसेच कलावंतांना सहकार्य करणे, यात गैर काहीही नाही. मात्र काँग्रेसच्या काळात अश्या साहित्यिक आणि कलावंतांमध्ये जे बोटचेपे होते, अश्यांना अवाजवी सहकार्य देऊन अकारण मोठे करण्यात आले होते. दिल्लीत नेहरू काळापासून अनेक कथित साहित्यिकांना सरकारी बंगले, वापरायला देण्यात आले. त्यांना मानधन देण्याचीही सोय केली गेली. मात्र असे करतांना ते साहित्यिक खरोखरी लायक आहेत काय? हे न बघता फक्त जे सरकारची भाटगिरी करतील त्यांनाच या सवलती दिल्या गेल्या, वर्षानुवर्षे असे साहित्यिक आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या सरकारी बंगले अडकवून बसल्या होत्या. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हा प्रकार थांबवला.
महाराष्ट्रात शरद पवारांनीही नेमके हेच केले. महाराष्ट्रात साहित्यिक आणि कलावंत मोठ्या संख्येत आहेत. मात्र काँग्रेसच्या राजवटीत जे सत्ताधाऱ्यांना झेलत फिरतात त्यांनाच मोठेपणा दिला गेला., त्यांना सरकारी महामंडळांवर नेमले गेले तर मोजक्या मंडळींना विधानपरिषदेतही पाठवले. मात्र इतर अनेक लायक लोक दुर्लक्षित ठेवले गेले. कारण ते राज्यकर्त्यांचे लांगुलचालन करत नव्हते. आजही प्रसिद्धी माध्यमांमध्ये पवारांच्या विरोधात लिहिणारे किंवा बोलणारे पत्रकार खड्यासारखे उचलून बाजूला ठेवले जातात. त्यांना प्रसंगी धमकावलेही जाते, अशी चर्चा आहे. हा प्रकार म्हणजे राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पाजणे नाही काय?
महाराष्ट्रातील साहित्यिक स्वयंप्रेरणेने वागणारे आहेत, असे असले तरी साहित्यिक क्षेत्रात राजकारण्यांची अकारण लुडबुड चालते. ती पवारांनी थांबवावी म्हणजे राजकारण्यांच्या ओंजळीने साहित्यिकांनी पाणी पिणे आपोआपच बंद होईल.

अविनाश पाठक

Leave a Reply