कुत्र्याच्या दोन महिन्यांच्या बेवारस पिलांना मारहाण करून जाळले

नागपूर : २३ एप्रिल – माणुसकीला काळीमा फासणारी घटना मानकापूर परिसरात उघडकीस आली आहे. कुत्र्यांची दोन महिन्यांची पिल्ले ओरडत असल्यामुळे झोपमोड होत असल्याचे एका व्यक्तीने त्या दोन महिन्यांच्या बेवारस श्वानांना मारहाण करून जाळले. सैतानालादेखील मान खाली घालायला लावणार्या या प्रकाराची पोलिस तक्रार देण्यात आली असून, प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
उत्थाननगर येथील उत्तमकुमार दास असे या निर्दयी इसमाचे नाव आहे. उत्तमकुमार हे नवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांना झोप येत नसल्याने ते झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत असत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराच्या आसपास मोकाट कुत्र्यांची दोन पिल्ले भटकत होती. रात्रीच्या वेळी दोन्ही पिल्ले हे ओरडत असत. यामुळे उत्तमकुमार यांची झोपमोड होत असे.
काही वेळा ही पिल्ले त्यांच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी वा महानगरपालिकेला याबाबत रितसर कळवण्याऐवजी त्यांनी स्वत:च त्या पिल्लांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केला. रागाच्या भरात या इसमाने गुरुवारी सायंकाळी कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारहाण करून मारून टाकले. त्यानंतर त्यांना घरामागील परिसरात जाळून टाकले होते.

Leave a Reply