राणा दाम्पत्य २३ एप्रिल रोजी करणार मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण

अमरावती : २१ एप्रिल – आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्यावर ठाम आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा यांनी २३ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. त्यांच्यासोबत ५०० हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. आमदार रवी राणांच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना आणि राणा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाबाबतच्या भूमिकेनंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली आणि राणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार हे स्पष्ट झाले. राणा दाम्पत्याच्या या घोषनेनंतर संतापलेले शिवसैनिक हजारोंच्या संख्येने मातोश्रीसमोर जमले. मात्र, राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर आले नाहीत. आता पुन्हा राणा यांनी २३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राणा हे २२ एप्रिल रोजी अमरावतीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना हिंदुत्व शिकवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावरील संकटे संपता संपत नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या मातोश्री बंगल्यावर संकट मोचक हनुमान यांचे हनुमान चालिसा करण्याचे आवाहन आम्ही केले होते. मात्र त्यांनी ते केले नाही. आता युवा स्वाभिमान पक्ष २२ तारखेला मातोश्रीवर जाऊन सन्मानपूर्वक हनुमान चालीसा पठण करणार आहे व मुख्यमंत्र्यांना सुद्धा पठण करायला लावणार आहे, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
हनुमान चालिसाचे हे पठण अत्यंत शांततापूर्वक करण्यात येणार असून एखाद्या वारीप्रमाणे केले जाईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे राणा म्हणाले. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हनुमान चालिसाला का विरोध करत आहेत हे समजत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Leave a Reply