राज ठाकरेंच्या माध्यमातून शरद पवारांना जातीयवादी ठरवण्याचे काम भाजपकडून सुरु – धनंजय मुंडे

सांगली : २१ एप्रिल – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जातीयवादी ठरविण्याचे काम राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप करीत असल्याची टीका समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी इस्लामपूर येथे झालेल्या परिवार संवाद यात्रेवेळी केली.
या वेळी प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आ. अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी सेलचे सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदी उपस्थित होते.
आव्हाड म्हणाले, की सध्या धर्माधतेचा सापळा लावला जात आहे. यात तरुण वर्गाने न अडकता विकास कामांना महत्त्व देण्याची गरज आहे. जेम्स लेन प्रकरण आता पुन्हा उकरून काढण्याची गरज नाही.
पाटील म्हणाले, की ५५ दिवसांत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून १४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील २५० विधानसभा मतदार मतदार संघात जाऊन आलो. २३ एप्रिलला कोल्हापूर येथील तपोवन मैदानात पवार यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेच्या समारोपाची सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा’
धनंजय मुंडे म्हणाले, की राज ठाकरे आज जे बोलतात ते उद्या त्यावर ठाम राहतीलच याची ग्वाही कोणीच देऊ शकत नाही. यामुळे अशा आरोपांना सामान्य जनता फारसे महत्त्वही देणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक आमदार निवडून येतील आणि भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल.

Leave a Reply