कारच्या डिक्कीत आढळल्या मृतदेहाचे गूढ उकलले

नागपूर : २१ एप्रिल – चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याची पती-पत्नीने हत्या केली. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला कारच्या डिक्कीत टाकले. त्यानंतर एका भंगारवाल्याने स्क्रॅप करण्यासाठी ही कार विकत घेतल्यानंतर कारच्या डिक्कीमध्ये नग्नावस्थेत हा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून, मृतदेहाची ओळख पटविण्यातदेखील पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे. कार्तिक हेमराज सेलोकार (वय ३७, रा. लक्ष्मीनगर, कळमना) असे मृतकाचे नाव आहे.
तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेलाईनला लागून असलेल्या गार्डलाईन परिसरात नौशाद शाह कय्यूम आणि त्याचा भाऊ अज्जू यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे स्क्रॅपमध्ये आलेली (क्रमांक एमएच ३१/ सीएम 0७४४) ची कार त्यांनी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी कारची डिक्की उघडली असता त्यांचे डिक्कीत जे दिसून आले ते पाहून त्यांना धक्काच बसला. या कारच्या डिक्कीत एक नग्न अवस्थेत मृतदेह त्यांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला आणि मृतदेह हा मेयोमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. प्राथमिक तपासात पोलिसांना दिलेल्या अहवालात मृतकाच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, हत्येचा कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यामुळे पोलिस आजूबाजूच्या परिसराची पाहणी करीत होते. यावेळी त्यांना एक लोअर पॅण्ट आणि अंडरपॅण्ट सापडली. पॅण्टच्या खिशात ३ सोन्याचे मणी आढळले. यादरम्यान कळमना पोलिस ठाण्यात एका व्यक्तीच्या मिसिंगची तक्रार पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना सापडलेल्या कपड्यांमधील मणींच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. मृतकाला पोटाचा काविळ होता. ११ तारखेला त्याला मेयोमध्ये भरती केले होते. पण, तो उपचार अध्र्यावर सोडून तो निघून गेला होता. त्याला दारूचे व्यवसन असल्यामुळे तो दारूच्या शोधात निघाला. पण, पैसे नसल्यामुळे पैशांकरिता तो चोरी करण्याच्या उद्देशाने १५ एप्रिल रोजी गार्डलाईन परिसरातील रेल्वेच्या पडक्या क्वॉर्टरमध्ये राहात असलेल्या भिकारी नासीर शेख वल्द मोहम्मद शोख (२५) आणि नसरीन शेख वल्द नासीर शेख या पती-पत्नीच्या घरात जबरदस्तीने घुसला.
यावेळी या पती-पत्नींनी त्याला शिवीगाळ करून घराबाहेर काढण्यासाठी धक्काबुक्की केली. परंतु, तो घराबाहेर जात नव्हता. परिणामी पती-पत्नीने मिळून त्याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केला. यात कार्तिकचा मृत्यू झाला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून त्यांनी रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह गार्ड लाईन परिसरात असलेल्या भंगारवाल्याच्या कारच्या डिक्कीमध्ये आणून टाकला होता.

Leave a Reply