वेळ आल्यास राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : २० एप्रिल – आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सलग १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत सत्ता काबिज करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाण्याचा प्रयत्न असेल; मात्र वेळ आल्यास राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते, नागपूरचे संपर्कमंत्री व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
वळसे पाटील यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने त्यांनी तयारीचा आढावा घेतला. यादरम्यान मनपा निवडणुकीसाठी २२५ जणांनी पक्षाकडे अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. ज्यांना-ज्यांना निवडणूक लढायची आहे, त्या सर्वांनी अर्ज करावे. राज्यस्तरीय नेत्यांनी या निवडणुकीत भाग्य आजमावावे. प्रत्येकाला एकएका प्रभागाची जबाबदारी दिली जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. काही पदाधिकार्यांनी दोन ते तीन प्रभागांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली. अधिकाअधिक जागा जिंकण्यासाठी एका एका प्रभागावर लक्ष केंद्रित करावे, असे वळसे पाटील म्हणाले. पक्षसंघटनेला अधिक बळकट करण्यासाठी पदाधिकार्यांनी प्रयत्न करावे, असेही निर्देश त्यांनी रविभवन येथे पार पडलेल्या या बैठकीत दिले. बैठकीला शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजीमंत्री रमेश बंग, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, सुबोध मोहिते, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, ईश्वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, वेदप्रकाश आर्य, प्रशांत पवार, श्रीकांत शिवणकर, वर्षा शामकुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply