महागाईची ‘मोदी कथा’ काँग्रेस पक्ष भोंग्यांवरुन लवकरच प्रसारित करणार – नाना पटोले

मुंबई : २० एप्रिल – सध्या महाराष्ट्रातील राजकारणात भोंग्यांची विशेष चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवाय, आता मनसेने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरातील मंदिरांवर भोंगे लावून महाआरती करणार असल्याचीही घोषणा केली आहे. अशाच प्रकारे आता काँग्रेस पक्ष देखील आता महागाईच्या मुद्य्यावरून मोदी सरकावर निशाणा साधण्यासाठी भोंग्यांचा वापर करणार आहे.
कारण, “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार आहे. तसेच, २०१४ मधील महागाईची ‘मोदी कथा’ काँग्रेस पक्ष भोंग्यांवरुन लवकरच प्रसारित करणार आहे.”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
तसेच “आम्ही काल पुण्यात प्रक्रीया सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी २०१४ ची भाषणं होती, तीच भाषण आता आम्ही जनतेसमोर वाजवतो आहोत. जे काही जुमले…,जुमलेबाजांनी दिलेत. कारण जुमला हा शब्द देखील त्यांचाच आहे. जुमला शब्द आमचा नाही या जुमलेबाजांनी जे शब्द दिले आणि ज्या पद्धतीने देशाच्या जनतेला स्वप्न दाखवलं, ५६ इंचाची छाती दाखवली आता ती कुठं गेली माहिती नाही. या सगळ्या व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात तीव्र चीड आहे. आज सर्वसामान्यांचं जगणं कठीण करण्याचं पाप केंद्रातील भाजपा सरकारने केलेलं आहे. त्याविरोधात काँग्रेस आंदोलन करतच आहे पण आता हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.” असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.
याशिवाय, “सिलेंडरचा भाव हजार रुपयांच्या वर! रॉकेलचा पुरवठा बंद! लाकडेही महाग! मोदीजी, गरीबांनी दोनवेळचा स्वयंपाक करायचा तरी कशावर? सीएनजी-पीएनजी पाईप गॅसचे दर विक्रमी स्तरावर. शहरी गॅस वितरकांना नवा पुरवठा बंद. वीज आणि खत निर्मितीसाठी गॅस कपातीची शक्यता. नव्या शहरांमध्ये विस्तार योजना थंड बस्त्यात. सामान्य जनतेला चुलीच्या धुराशिवाय पर्याय नाही. गॅस, पेट्रोल-डिझेल महाग, हॉटेलिंग बंद, वाहन चालविणे बंद. पूर्वीच्या पैशात निम्मा किराणा. घर चालवणे अशक्य! मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांची महागाईमुळे कोंडी! सर्वकाही आपल्या फकीर पंतप्रधानांना आठ हजार कोटींच्या विमानातून जगप्रवास करता यावा म्हणून!” असं म्हणत नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Leave a Reply