भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास विशेष वाटायला नको – पृथ्वीराज चव्हाण

कराड : २० एप्रिल – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घटना व लोकशाही संपवायची असून, स्वातंत्र्यापूर्वीची समाजव्यवस्था आणायची असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास विशेष वाटायला नको अशी चिंताही चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.
काँग्रेसच्या इतर मागासवर्ग शाखेतर्फे कराड येथे आयोजित मेळाव्यात चव्हाण हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की ओबीसी समाजाच्या महामंडळाची कर्जवसुली आत्तापासून स्थगित करीत आहे. ओबीसी समाजासाठी कर्जमर्यादा दहा लाखांवरून थेट दुप्पट करीत आहे. सातारा जिल्ह्यातील कटगुणला महात्मा फुले यांच्या भव्य स्मारकासाठी २५ कोटी रुपये देण्याबरोबरच ओबीसींसाठी महात्मा जोतिबा फुले घरकुल योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply