प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनून शिवाजी घडवण्याचा संकल्प करणे ही आजची गरज – कांचन गडकरी

नागपूर, २० एप्रिल –आज 21व्या शतकात माणसांमधला आणि कुटुंबातला संवाद संपला आहे तर आम्ही मोबाईलवर चॅट करतो आहोत.आज पैसा खूप स्वस्त झाला. मात्र माणसासाठी माणूस महाग झाला आहे. आम्हाला नवी पिढी घडवताना शिवाजी शेजारच्या घरात घडावा असे वाटते. यावेळी प्रत्येक स्त्रीने स्वतः जिजामाता बनून घराघरात शिवाजी घडवण्याचा संकल्प करणे ही आजची खरी गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांचन गडकरी यांनी केले.
भारत विकास परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेची नवी शाखा भारत विकास परिषद नागपूर स्मार्ट सिटी शाखा या नावाने गठित करण्यात आली आहे. या शाखेच्या उद्घाटन आणि कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून कांचन गडकरी बोलत होत्या. यावेळी भारत विकास परिषदेच्या विदर्भ प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर घुशे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माजी महापौर दयाशंकर तिवारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना कांचन गडकरी म्हणाल्या की, भारतीय समाज व्यवस्थेत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. स्त्रीने योग्य संस्कार केले तरच सुसंस्कृत युवापिढी घडू शकते. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. त्यामुळेच आमच्या संस्कृतीत पुरुषाच्या आधी स्त्रीचे नाव जोडले जाते. स्त्रीने ठरवले तर ती परिवर्तन घडवू शकते यासाठी तिला प्रेरणा देणे गरजेचे आहे. तिला आत्मसन्मानही मिळायला हवा अशी अपेक्षा कांचन गडकरी यांनी व्यक्त केली.
आज समाजात वाईट गोष्टींची संख्या वाढली आहे. प्रत्येक माणसात सुर म्हणजेच देव आणि असूर म्हणजेच दानव दडलेला आहे. समाजातील वाढत्या असूरशक्तीला संपवून देवत्व जपणारा समाज घडवण्यासाठी भारत विकास परिषदेसारख्या संघटनांची गरज आहे असे प्रतिपादन माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी बोलताना केले.
आज शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र त्यांचा लाभ सामान्य माणसाला मिळत नाही. अशावेळी ही जबाबदारी सामाजिक संघटनांनी घेणे गरजेचे आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट सरकारने करावी म्हणून वाट पाहतो. मात्र हे थांबायला हवे. पुरोहित यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करेल मात्र समिधा टाकण्याची जबाबदारी आपलीच असते असे सांगून या मुद्यावर जनसामान्यांना जागृत करण्याची जबाबदारी सामाजिक संघटनांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारत विकास परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर घुशे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
प्रारंभी दिपप्रज्वलनानंतर भारत विकास परिषद नागपूर स्मार्ट सिटी या नव्या शाखेचे पालक आणि विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य अविनाश पाठक यांनी आपल्या प्रास्तविकात भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्याची माहिती देत या नव्या शाखेचे प्रयोजन उपस्थितांना विषद केले. त्यानंतर नव्या शाखेला मान्यवरांच्या हस्ते चॉर्टर प्रदान करण्यात आले. या शाखेच्या अध्यक्ष रंजना लाभे आणि सचिव श्रुती देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यकारिणीने चार्टर स्वीकारले. विदर्भ प्रांताचे महासचिव पद्माकर धानोरकर यांनी सर्व नवीन सदस्यांना शपथ प्रदान केली.
पद्भार स्वीकारल्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष रंजना लाभे यांनी आपले विचार व्यक्त केले. आभारप्रदर्शन श्रुती देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंजली वडोदकर यांनी केले.
यावेळी पद्ग्रहण झालेली कार्यकारिणी अशी आहे-
अध्यक्ष- रंजना लाभे, सचिव -श्रुती देशपांडे, उपाध्यक्ष- अजिता डोर्लीकर आणि दत्ताजी धामणकर, कोषाध्यक्ष- डॉ. दिपिका सिंग, ग्रामविकास प्रमुख – संतोष आत्राम, संस्कार प्रमुख – संजय डबली, सेवाप्रमुख – महेश शेंडे, सहसचिव – श्रीधर दफ्तरी, सहकोषाध्यक्ष- नितीन इंदूरकर, महिला प्रमुख -अंजली वडोदकर कार्यक्रम प्रमुख – अंजली बोरावार, सहप्रनमुख पारुल लाभे, प्रसिद्धी प्रमुख- शेखर पाटणे, जनसंपर्क प्रमुख – अनिल इदाणे.
कार्यक्रमाला मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply