त्यांनी काहीही केलं तरी पोलखोल यात्रा थांबणार नाही – देवेंद्र फडणवीस

पुणे : १९ एप्रिल – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच भाजपाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली. यानंतर सोमवारी (१८ एप्रिल) या पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक झाली. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते पुण्यात बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच आहे. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू.”
भाजपाकडून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. तसेच हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपाने पोलखोल यात्रा सुरू केलीय. मात्र, त्याआधीच या पोलखोल यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या रथाची सोमवारी (१८ एप्रिल) काही अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. दगड मारून या रथाच्या काचा फोडण्यात आल्या. भाजपाने ही तोडफोड महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केलाय.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी ही तोडफोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी केलीय. तसेच आरोपींना तातडीने अटक न केल्यास ठिय्या आंदोलनाचा इशाराही दिलाय.

Leave a Reply