अमरावतीत दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात जमावबंदी लागू , भाजप नेत्यांना शहरात जाण्यापासून रोखले

अमरावती : १८ एप्रिल – जिल्ह्यातील अतिसंवेदनशील शहर म्हणून म्हणून परिचित असलेल्या अचलपूर येथे रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास झेंडा काढण्यावरून झालेला वाद विकोपाला गेला. दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात जमावबंदी लावण्यात आली आहे.
अचलपूर शहरातील प्रवेशद्वार असलेल्या खिडकी गेट आणि दुल्हा गेट येथील ऐतिहासिक मोठ्या दरवाजांवर दरवर्षी सण-समारंभ प्रमाणे विविध धर्माचे झेंडे लागतात. मात्र काल रात्री बारावाजेच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढल्याने वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत बदलून दोन गटात राडा झाला. मध्यरात्री शहरवासीय झोपेत असताना हा राडा झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी मिळून कारवाई केली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे. अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गरुड यांनी या घटनेबाबात माहिती दिली. अचलपुरात दोन गटात झालेला वाद विकोपाला जाण्याच्या पूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात रात्रीपासून जमाबंदी सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना रात्रीच अचलपूर येथे दाखल झालेत. आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी 100 ते 150 आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकिशोर मीना यांनी दिली आहे.पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. SRPF च्या तीन कंपन्या, अमरावती शिवाय अकोला येथील 100 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अचलपूर येथे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर या भागाचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारावरच रोखल्याने पुन्हा परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत माहिती देतांना विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणाले की, ‘सध्या शहरात संचारबंदी आहे. कुठल्याही कारणासाठी कोणीही शहरात प्रवेश करू शकत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे.’

Leave a Reply