२०२४ मध्ये ही जागा भाजपा १०० टक्के जिंकणार – देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : १७ एप्रिल – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूरला पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. या विजयामुळे जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. दरम्यान या पराभवानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सत्तारूढ महाविकास आघाडी आणि भाजपा या दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक बडय़ा नेत्यांनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा नेत्यांनी कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली होती. वादग्रस्त विधाने, आरोप-प्रत्यारोप, हिंदुत्व यावरून वातावरण तापल्याने निवडणुकीने अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना तीन पक्ष एकत्र लढले असले तरी मागील वेळी एका पक्षाला मिळाली होती तेवढीच मतं मिळाली आहेत असं म्हटलं. निवडणुकीत सहानुभूतीचा फॅक्टर असेल याची आम्हाला थोडी कल्पना होती. आपण जर २० निवडणुका अशा काढल्या जिथे उमेदवाराचं निधन झालं आहे त्यांच्या घरचं कोणी उभं असेल आणि विशेषत: पत्नी तर त्या निवडून आल्या आहेत. ती आमची मानसिकता आहे. पण अशाही स्थितीत भाजपाला जी मतं मिळाली त्यातूम मी समाधानी आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. २०२४ मध्ये ही जागा भाजपा १०० टक्के जिंकणार याची मला खात्री पटली आहे असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास भाजपाचा निभाव लागणे कठीण जाते, हे पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघापासून ते कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले आह़े तीन पक्ष एकत्र लढल्याने मतांचे विभाजन होत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढविल्यास त्याचा भाजपावर निश्चितच परिणाम होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत गुलालाची उधळण करीत असा जल्लोष केला.

Leave a Reply