संपादकीय संवाद – मशिदींवरील भोंगे प्रकरणी मुस्लिमांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे

मशिदीवरचे भोंगे हे प्रकरण आता चांगलेच चिघळलेले दिसत आहे,राज ठाकरे यांनी आधी इशारा दिला त्यानंतर हनुमान जयंतीला पुण्यात महाआरती करण्याची घोषणा केली, त्यामुळे इतर पक्षही खडबडून जागे झाले आहेत. काल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी हनुमान जयंतीच्या शोभायात्रा काढत आम्हालाही हिंदूंबद्दल प्रेम आहे हे दाखवण्याचा लटका प्रयत्न केला. आज आता राज ठाकरे यांनी पत्रपरिषद घेऊन पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
मुळातच सार्वजनिक जागी ध्वनिक्षेपक लावून जाहीर कार्यक्रम करणे यासाठी कायद्याने पोलीस परवानगी अवषयक असते, मात्र कायदा धाब्यावर बसवत मुस्लिम धर्मगुरूंनी वर्षानुवर्षे मशिदींवर ध्वनिक्षेपक लावून अजान देणे सुरूच ठेवले आणि राज्यकर्त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या ध्वनिक्षेपकांमुळे इतर धर्मियांना त्रास होतो, मात्र सरकारविरुद्ध आवाज उठवण्याची हिम्मत कुणी करत नव्हते. आता राज ठाकरेंनी ही हिम्मत केली आहे. अश्यावेळी सर्व पक्षीयांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे, मात्र शिवसेनेने या मुद्द्याचे राजकारण करत राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्यांबाबत बोलण्याऐवजी गरिबी आणि बेरोजगारीवर बोलावे अशी सूचना केली आहे.
एकूणच या विषयावर आता वातावरण तापते आहे, अश्यावेळी मुस्लिमांनाही सामंजस्याने संघर्ष कसा टाळता येईल, हे बघावे आणि हिंदूंनीही जास्त ताणू नये, तेच सर्वांच्या हिताचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply