देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा – भोंग्यांवरून राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

पुणे : १७ एप्रिल – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यात हनुमान जयंतीला खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करत असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं आहे. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्यावरुन इशारा दिला आहे.
“देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा. ३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे. मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. परंतु त्यांना वाटत असेल की लाउडस्पीकर मधूनच ऐकवणार आहोत. तर तर आमच्या आरत्या त्यांना लाउडस्पीकर ऐकाव्या लागतील,” असे राज ठाकरे म्हणाले.
“सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनधिकृत कशा मानता. मशिदिवरील भोंगे शांतता भंग करत असतील तर त्यांना परवानगी देऊ नका असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मुस्लिम समाजालाही समजले पाहिजे की या देशापेक्षा त्यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना त्याचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणे आवश्यक आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.
“माझ्या सभेमध्ये मी स्पष्ट केले होते की, हा सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्षे हा विषय असाच राहिला आहे. तुम्ही पाच वेळा भोंगे लावणार असाल तर दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू,” असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनसेने शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुणे शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महाआरतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. अलीकडेच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशभरातील मशिदींबाहेरील लाऊडस्पीकरच्या विरोधात भूमिका घेतली आणि ३ मेपर्यंत ते हटवण्याची मागणी केली आहे. मशिदींवरील लाऊडस्पीकर न काढल्यास मनसे मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवेल, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला याआधीही दिला आहे.

Leave a Reply