सुरेश भटांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष म्हणजेच आशाताई – विष्णु मनोहर

आशा पांडेंच्या ‘अंतरीचे सुर’ ची चवथी आवृत्ती लोकार्पित

नागपूर : १६ एप्रिल – गझल म्हणजे कवितेच्या अंतर्मनात शिरलेली कविता ज्याचे सुरेश भट यांनी बीजारोपण केले.नंतर ते अधिपत्य कवी ग्रेस यांनी समर्थपणे सांभाळले व दोन दशकांपासुन महाराष्ट्रातील पहिली महिला गजलकार या नात्याने आशा पांडे हे ती धुरा समर्थपणे सांभाळुन आहे. भट,ग्रेस, आशाताई हे सर्व नागपूरकर असूनही गझल येथे हवी तशी रुजली नाही व यासाठी सर्व साहित्य प्रेमीनी पुढाकार घ्यायला हवा,साहित्य विहार च्या माध्यमातून साहित्य सेवेचे जीवनव्रत घेतलेल्या आशाताईंच्या पाठीशी ताकतीनं ऊभं राहायला हवं असे आवाहन प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केले.
साहित्य विहार संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखिका आशा पांडे यांच्या ‘अंतरीचे सूर’ या गझल संग्रहाच्या चवथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, लेखिका व समुपदेशक सना पंडित, साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा व बहुभाषीक ज्येष्ठ लेखिका आशा पांडे उपस्थित होत्या.
सुरवातीला आशा पांडे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांचा तीन दशकांचा साहित्य प्रवास थोडक्यात ऊलगडला व सुरेश भटांच्या काही रोचक व प्रोत्साहन देणा-या आठवणी सांगितल्या तसेच ह्या पुस्तकाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन २००० साली आशाताईंची जवळची मैत्रिण डाॅ सुलभा हेर्लेकर यांनी केले होते,त्याही आठवणींना ऊजाळा दिला.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी शैलेश पांडे म्हणाले, गझल ह्या काव्यप्रकारात पूर्ण कवितेची ताकद दोन ओळीत मांडण्याची ताकद आहे. अरबी भाषेतून आलेला तो अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे व हिंदी संगीतावर तर ‘गजल’ जणु राज्यच करते.त्यांनी भरपूर ऊदाहरणांसह गजलेचा ईतिहास व काळानुरुप त्याचं बदलत गेलेलं स्वरूप यावर विस्तृत व आशयपुर्ण भाष्य केले.
पुस्तकावर भाष्य करताना लेखिका सना पंडित म्हणाल्या, ह्या गजला आपल्याला आतून ढवळून काढतात व आत्मनिरीक्षण करण्यास भाग पाडते.गजलसाठी भावालंकार हवा म्हणजेच ती प्रचंड ताकदवान होते जो अंतरीचे सुर ह्यात भरपुर आहे. आशाताईंची गजल ही सर्वंकष असुन तीला विषय व पारंपारिक भावना प्रकाराचे बंधन राहिलेले नाही,हे त्यांच्या गज़लेचा आवाका विस्तृत असण्याचे द्योतक आहे.
कार्यक्रमात जितेंद्र पटवर्धन यांनी ‘अंतरीचे सुर’ या संग्रहातील काही गझल गाऊन सादर केल्या तर डाॅ ॠचा हळदे यांनी निवडक गजलांचे लयबद्ध वाचन केले.
याप्रसंगी विविध साहित्य संस्थाव्दारे लेखिकेचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.साहित्य विहार संस्थेतर्फै सचिव डाॅ अर्चना अलोणी यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.
साहित्य प्रेमींनी सभागृह भरगच्च असलेल्या कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन सुषमा देशपांडे-मुलमुले यांनी तर आभार प्रदर्शन साहित्य विहार सहसचिव मंदा खंडारे यांनी केले.

Leave a Reply