शिवसेनेला आव्हान देण्यासाठी रवी राणा खूपच लहान – अनिल परब

मुंबई : १६ एप्रिल – रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्पत्य आजपर्यंत सुपाऱ्याच घेऊन काम करत आले आहे. त्यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा दिला होता. पण शिवसेनेला आव्हान देण्यासाठी रवी राणा खूपच लहान आहेत. किंबहुना रवी राणा यांची तेवढी औकादही नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केले. राणा दाम्पत्याने शुक्रवारी आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी शिवसैनिकांना मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊनच दाखवावे. ते परत कसे जातात, हे आम्ही पाहतो, अशी भावनाही शिवसैनिकांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला.शिवसेना सत्तेत आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, त्याआधी आम्ही शिवसैनिक आहोत. त्यामुळे कोणीही आम्हाला आव्हान देण्याच्या फंदात पडू नये, असे अनिल परब यांनी म्हटले. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राजकारणात स्वत:चे असे स्थान नाही. ते आजपर्यंत सुपाऱ्या घेऊनच काम करत आले आहेत. त्यांचा बोलवात धनी जे सांगतो, ते स्क्रिप्ट वाचण्याचे काम राणा दाम्पत्य करते, अशी टीका अनिल परब यांनी केली. तसेच हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, असेही परब यांनी सांगितले.
देशभरात आज हनुमान जयंती साजरी होत आहे. मात्र, महाराष्ट्रात यावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी पुण्यात हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply