भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारच्या डिक्कीतून निघाला अनोळखी व्यक्तीचा विवस्त्र मृतदेह

नागपूर : १६ एप्रिल – आठवड्याभरापूर्वी भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिक्कीत एका अनोळखी व्यक्तीचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी हत्या करून तो डिक्कीत लपविल्याचे दिसून येत आहे.
मोमीनपुर्यातील गार्डलाईन ते मेयो मार्गावर (रेल्वे पटरीजवळ) नौशाद शहा कयूम शहा (वय २७) याचे ताज स्पेअर पार्ट नावाने दुकान आहे. तो भंगारात मोठमोठी वाहने विकत घेतो. सुटे भाग वेगळे केल्यानंतर वाहन कापून ते भंगारात विकतो. नौशादने आठ दिवसांपूर्वी नागपुरातीलच एका व्यक्तीकडून एक शेवरलेट कंपनीची कार (एमएच ३१- सीएम 0७४४) विकत घेतली. ती आठ दिवसांपासून त्याच्या गोदाम परिसरात पडून होती. तीन दिवसांपासून कारमधून दुगर्ंध सुटला. मात्र, मांजर किंवा उंदीर सडला असावा, असे समजून नौशाद आणि त्याच्याकडे काम करणार्यांनी दुर्लक्ष केले. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास नौशाद आणि त्याची माणसं कारजवळ जाताच त्यांना डिक्कीतून तीव्र दुर्गंधी आली. डिक्की उघडताच त्यात मृतदेह आढळला.
ही माहिती त्यांनी तहसील पोलिसांना कळविली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. शरीरावर कोणतीही जखम नव्हती. मात्र, मृतदेह पुरता विवस्त्र असल्यामुळे आरोपींनी हत्या करून कारच्या डिक्कीत मृतदेह लपवल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी मृत व्यक्ती कोण आणि त्याची हत्या कशी झाली, याचा तपास सुरू केला आहे. मृताची ओळख पटली नाही. मात्र, वैद्यकीय अहवालात डोक्यावर लोखंडासारख्या जाड वस्तूचा जोरदार फटका मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.

Leave a Reply