संपादकीय संवाद – मशिदीवरील भोंगे प्रकरण आता देशभर पेटणार काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या मशिदींवर वाजणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला आहे, या मुद्द्यावर आता देशभरात राजकारण पेटते आहे, असे चित्र दिसून येते आहे. राज ठाकरे हे हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्यात महाआरती करण्यात असल्याची बातमी आहे. त्या पाठोपाठ अमरावतीच्या लोकसभा सदस्य नवनीत राणा आणि त्यांचे पती विधानसभा सदस्य रवी राणा यांनी आपापल्या मतदारसंघात मंदिरांना हनुमान चालीसा वाजवण्यासाठी लाऊडस्पिकर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. भरीस भर आज उत्तर प्रदेशात अलिगढ येथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर मैदानावर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसाचे पठण केल्याची बातमी समाजमाध्यमांवर फिरते आहे. एकूणच प्रकरण चांगलेच पेटते आहे.
उत्तरप्रदेशातील अलिगढ हे शहर मुस्लिमांचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखले जाते, याठिकाणी भारतात एकमेव असलेले अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आजही कार्यरत आहे. त्याठिकाणी हनुमान चालीसाचे लाउड्स्पिकर लावून पठण केले जाणे बघता आता देशभरातील हिंदू जागरूक तर झाले आहेतच पण आक्रमकही होतांना दिसत आहेत.
वस्तुतः पहाटे ४ वाजल्यापासून तर रात्रीपर्यंत दिवसभरात पाचवेळा मशिदीवर भोंगे लावून अजान देणे हे इतर धर्मियांवर अन्याय कारण्याजोगेच आहे. भारतात विविध धर्माचे लोक एकत्र नांदतात, मात्र अन्य धर्मीयांमध्ये अश्या प्रकारे वर्षाचे ३६५ दिवस इतरांना त्रास दिला जात नाही. सणासुदीला ठीक आहे, मात्र इतर वेळा हिंदू बांधव आपली आरती घरातच करतात, ख्रिश्चनांची प्रेयर, बौद्धांची बौध्दवंदना किंवा जैनांची प्रार्थना चार भीतीच्या आडचं होते, मग मुस्लिमांनाच ही विशेष सवलत का? असा प्रश्न निर्माण होतो. मतांच्या लांगूलचालनासाठी सुरु झालेला हा प्रकार आता मुस्लिम मुल्ला मौलवींना आपला अधिकार वाटू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या ठाणे येथील सभेनंतर वृत्तवाहिन्यांवर काही मौलवींचे बाईट दाखविले गेले, त्यात कयामत तक म्हणजेच जगाच्या अंतापर्यंत आम्ही मशिदीवरचे भोंगे काढणार नाही, अशी मग्रुरी त्यांनी केल्याचे दिसून आले. ही मग्रुरी देशाला आणि समाजाला धोकादायक ठरू शकते.
एकूणच हे प्रकरण आता चांगलेच तापते आहे, मात्र यामुळे फक्त राज्यातच नव्हे तर देशातही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी अश्या धर्मांधांना आवरणे गरजेचे झाले आहे. अन्यथा देशात पुन्हा एकदा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हा धोका लक्षात घेतला पाहिजे.

अविनाश पाठक

Leave a Reply