राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही – नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

पुणे : १५ एप्रिल – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही. मुळात संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असं मला खुद्द रतन टाटांना समजावून सांगावं लागलं होतं, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली. ते आज पुण्यात बोलत होते. हे सगळं मला रतन टाटांना औरंगाबादच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी सांगावं लागला होतं, असं स्पष्टीकरण देखील गडकरी यांनी दिलं आहे.
नितीन गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी मुकुंदराव पणशिकर नावाचे गृहस्थ संघाचे प्रचारक होते. त्यांनी गडकरींजवळ आग्रह धरला की या हॉस्पिटलचे उद्घाटन हे रतन टाटा यांच्या हस्ते करायचं आहे. त्यांच्या सांगण्यावरुन नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव रतन टाटा हे स्वतः औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. मात्र, विमानातून उतरताच रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांना ‘ये हॉस्पिटल केवल हिंदु समाज के लिये हे क्या?’ असा प्रश्न विचारला.
त्यावर गडकरी यांनी तुम्हाला असं का वाटतं विचारलं असता, रतन टाटा म्हणाले की हे संघाचे हॉस्पिटल आहे म्हणून विचारलं. पण गडकरी यांनी असं नाही, असं सांगत हे पूर्ण समाजासाठी आहे. संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असे स्पष्टीकरण दिलं होतं.
त्याचबरोबर या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातील शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे. परदेशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत, अशी खंत गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली. विशेषतः ग्रामीण भागात ही परिस्थिती अतिशय बिकट आहे, असं सांगत ग्रामीण भागात शिक्षणासाठी शिक्षक, शाळेची बिल्डिंग, तर कुठे विद्यार्थी नाहीत, सगळं असेल तर तिथं शिक्षण नाही, अशी मिश्किल टिप्पणी देखील नितीन गडकरी यांनी केली आहे .

Leave a Reply