राज ठाकरेंच्या आवाहनाचे लोण उत्तरप्रदेशात, अलिगढमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण

लखनौ : १५ एप्रिल – महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंग्याचा वाद आता देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच मनसैनिकांना मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याता आदेश दिला आहे. दरम्यान आता हा वाद फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला दिसत नाही. उत्तर प्रदेशातही हा वाद पेटताना दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या आंदोलनाची हाक उत्तर प्रदेशापर्यंत गेल्याची चर्चा सुरु आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये युवा क्रांती मंचच्या कार्यकर्त्यांनी गांधी पार्कमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठण केलं. आपण याआधीही प्रशासनाला मशिदींवरील लाऊडस्पीकर कमी करण्यासाठी पत्र दिलं होतं असं युवा क्रांती मंचचं म्हणणं आहे. पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केलं.
युवा क्रांती मंचचे शिवांग तिवारी यांनी चौकात लाऊडस्पीकर लावण्यात येतील असं सांगितलं असून यासाठी सकाळी ५ आणि संध्याकाळी ५ ची वेळ ठेवण्यात आली आहे. याचवेळी अजान होते. त्याचवेळी आमचा हनुमान चालिसा सुरु होईल. आम्ही हनुमान चालिसा पठण आणि आरती करणार असं ते म्हणाले आहेत.
अलीगडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने चौकात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्यातच आता ते प्रशासनाला अल्टिमेटम देत आहेत. ABVP चे बलदेव चौधरी यांनी जर प्रशासनाने परवानगी दिली नाही आणि काही योग्य कारण दिलं नाही तर आम्ही १९ एप्रिलला परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावणार असा इशारा दिला आहे.
अलीगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्यासंबंधी मंत्री धर्मपाल सिंग यांना विचारण्यात आलं असता ते मीडियावर संतापले. अनावश्यक वाद निर्माण केला जात असून आपल्याला कुठेही चौकात असा प्रकार दिसला नसल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply