ताजा कलम – ल.त्र्यं.जोशी

खरा कोरोनायोध्दा किंवा खरे कोरोनायोध्दा

मजकुराचे दोन मथळे वाचून त्यांचे प्रयोजन काय, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो म्हणून प्रथम त्याचा खुलासा.मजकूर वाचून तो महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आहे, हे लगेच लक्षात येईल.त्यांच्याबद्दल लिहायचे म्हणजे ‘खरा ‘ हा एकेरी शब्द वापरणे योग्य वाटले नाही.कारण आपले मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता.एकेरी शब्द वापरून आपण तिचा अपमान कां करावा, असा विचार मनात आला.म्हणून तो प्रकार टाळण्यासाठी ‘खरे’ हा अनेकवचनी शब्द वापरण्याचा प्रयत्न केला.कृपया हे मराठी भाषेच्या अस्मितावाद्यांनी लक्षात घ्यावे व अडचण समजून घ्यावी.
आणखी एक खुलासा प्रारंभीच करतो.खरे तर कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या संकटाशी यशस्वीपणे मुकाबला करून मुख्यमंत्री जेव्हा प्रथमच मंत्रालयात प्रवेश करतात, तो जागतिक विक्रमच ठरतो.पण संवैधानिक अडचणीमुळे त्याचा राष्ट्रीय विक्रम म्हणूनच उल्लेख करावा लागतो.कारण जगात ‘ मुख्यमंत्री’ या पदाचा उल्लेख फक्त भारतीय राज्यघटनेतच आहे. त्यामुळे तो ‘जागतिक’ असा उल्लेख केला असता तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या जयंतिदिनी तांत्रिकदृष्ट्या तरी अपमानच ठरला असता.त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या विक्रमाचे राष्ट्रीय विक्रम असा उल्लेख करणे भाग होते. कृपया तेही समजून घ्यावे.
अर्थात त्यामुळे या विक्रमाचे विश्वपातळीवरील महत्व यत्किंचितही कमी होत नाही.कारण कोरोनानियमावलीतील होम क्वारंटाईन हा नियम सर्वार्थाने पाळणारे उध्दवजी हे जगातील पहिले सरकारप्रमुख ठरतात.त्यावरून त्यांचा ‘ घरकोंबडा’ म्हणून उल्लेख करणार्यांनी महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा किती भयंकर अपमान केला, हे स्पष्ट व्हावे.
खरे तर तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच मंत्रालयात येऊन माननीय मुख्यमंत्र्यानी अनेक लोकसमज खोटे ठरविल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.कोरोनाविरोधी महामारीचे विश्वस्तरावरील नेतृत्व करून त्यानी सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती सिध्द केली तर आता कुणाही नेत्याला वा सेनापतीलाही लढ्याचे नेतृत्व करताना फ्रंटवर जाण्याची गरज नाही.अगदी आपल्या घरात राहूनही ते करता येते, हे बेटं या विरोधी नेत्यानाच काय त्या नरेंद्रभाई मोदीनाही कळत नाही.वास्तविक त्यानीही दिल्लीच्या लोककल्याण मार्गावरील सातव्या क्रमांकाच्या बंगल्यात बसून कारभाराची सुत्रे हलवायला हवीत.त्यासाठी त्यांनी मागितले असते तर मुख्यमंत्र्यानी त्याना मार्गदर्शनही केले असते .पण ते पडले संघ
स्वयंसेवक.त्याना ढोरमेहनत करण्याची सवय पडली आहे. एखाद्या पंतप्रधानांनी किती काम करावे, किती दौरे करावेत, याला काही मर्यादा आहेत की, नाही? त्यावर किती खर्च होतो.आमच्या मुख्यमंत्र्यानी दोन वर्षात असा किती तरी खर्च वाचविला.पण त्यां
चे कुणाला कौतुकच नाही. मोदींचा मात्र उदोउदो होतो.बरोबर आहे काय हे?
वास्तविक कोरोनाकाळाचा अनुभव लक्षात घेतला तर कायम वर्क फ्राॅम होमी पध्दत कायमपणे स्वीकारली पाहिजे.त्या पध्दतीत बरेच खर्च वाचतात आणि कर्मचार्यांकडून रगडून कामही करून घेता येते.
मुख्यमंत्र्यानी एवढे करूनही शेवटी आकडा दाखविला जातो तो महाराष्ट्रातील सर्वाधिक मृत्युंचा. त्या किरिट सोमय्याचा अनिल देशमुखांवरील वा नवाब मलिकांवरील आरोप एकवेळ समजता येईलही.कारण त्याना सांभाळून घ्यायला जाणते राजे समर्थ आहेत पण त्याने कोरोनाकाळातील भ्रष्टाचाराचा आरोप मुंबई महापालिकेवर करावा म्हणजे खूपच झाले.बिचार्या माजी महापौर साध्वी किशोरीताई पेडणेकर ,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संत यशवंत जाधव किती कष्ट उपसत होते कोरोना कोरोनाकाळात? पण कुणाला कदर असेल तर ना?तो किरिट सोमय्या तर आमचे संजयभाऊ आणि अनिलभाऊ यांच्या हात धुवून मागे लागला आहे व आमच्या कुटुंबावरही उलटला. वरून मोदीजीही त्यालाच साथ देत आहेत.
पण या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून मंत्रालयातील माझ्या तमाम मराठी बांधवाना काल साक्षात मुख्यमंत्री पंढरीच्या पांडूरंगासारखे येऊन उभे राहिले, त्यांची जातीने विचारपूर्वक करू लागले,तेव्हा त्याना केवढा दिलासा मिळाला असेल! पण आहे का कुणाला त्याचे कौतुक?खरे तर या दोन वर्षांच्या यशस्वी वर्क फ्राॅम होमबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचा महाकोरोना सन्मान किंवा कोरोना महासन्मान देऊन गौरव करायला हवा.महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर तर त्यांचाच हक्क पोचतो.पण स्वतःच स्वतःला पुरस्कार देणे महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाही.पण निदान संसदेने तर त्यांचा गौरव करावा ना?पण आपण इतके करंटे आहोत की, योग्य कर्तृत्वाचा योग्य गौरव आपल्याला करताच येत नाही.नशीब एकेकाचे!

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर

Leave a Reply