गडचिरोलीत नक्षल्यांनी दोन नागरिकांची दगडाने ठेचून केली हत्या

गडचिरोली : १५ एप्रिल – गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित सुरजागड लोह प्रकल्पस्थळी १३ एप्रिलला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन हजार युवकांना रोजगार नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला बारा तास उलटत नाही तोच स्थानिक दोन नागरिकांची नक्षलवाद्यांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना काल (१४ एप्रिल) उघडकीस आली. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून दोन्ही युवकांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोहखनिज प्रकल्पात कालच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमानंतर नक्षली सक्रिय झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. हेडरी पोलीस उपविभागीय क्षेत्रात गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत ही घटना घडली आहे. दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एक ग्रामस्थ दलसू हिचामी याची झारेवाडा येथे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, तर दुसरा आत्मसमर्पित नक्षली नवीन नरोटे याची गोलगुट्टा येथे हत्या केली. ते दोघेही आपल्या घरी झोपलेले असताना रात्री नक्षलवादी गावात आले आणि दोघांनाही उचलून गावाबाहेर नेले. त्यानंतर आज सकाळी त्या दोघांचेही मृतदेह रस्त्यावर आढळून आले. या घटनेनंतर नक्षल शोधकामी अधिक पोलीस कुमक रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांना ठार केले. तर एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयक यांनी दिली.

Leave a Reply