राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, मनसेला भाजपसोबत घेण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही – चंद्रकांत पाटील

पुणे : १४ एप्रिल – मुंबईत गुढीपाढव्याच्या दिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर भाजपचे काही नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटून गेले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप-मनसे युती होणार का ? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनसेला भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं. या सगळ्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर दिलं आहे.
“राज ठाकरे साहेब एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना जी मतं मांडायची आहेत. त्यांनी ती त्या-त्या वेळेला मांडली आहेत. अनेकदा मोदींच्या विरोधातही मांडली आहेत. महाविकास आघाडी आणि पवार साहेबांचं असं आहे, त्यांना बरं म्हटलं तरच बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला तर न्याय आणि कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड हे काही बरोबर नाही. राज साहेब ठाकरे हे त्यांची मतं अतिशय परखडपणे मांडत असतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, मनसेला भाजपसोबत घेण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करण्यासाठी भाजपाची १३ जणांची कोर कमिटी आहे. ते देखील यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. फार फार तर केंद्राकडे प्रपोजल पाठवू शकतात. त्यामुळे आता अशी कुठलीही शक्यता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
तर, अखंड हिंदुस्तान आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यासंबंधी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा संदर्भाची मागणी सातत्याने सुरू आहे. सरकारमध्ये असलेल्या भाजपचा त्याला सपोर्टदेखील आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करून स्वातंत्र्यवीर सावरकरांना, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या सगळ्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे, असंही पाटील म्हणाले.

Leave a Reply