भंडाऱ्यातील युवकाच्या हत्येत पाच आरोपी अटकेत

भंडारा : १४ एप्रिल – तुमसर शहरातील माकडे नगरात १२ एप्रिल रोजी झालेल्या मोनू विणू गेडाम या तरुणाच्या हत्येप्रकरणी काही तासातच पाचही आरोपींना अटक करण्यात तुमसर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपींमध्ये दोघे मुख्यतर तिघे विधीसंघर्ष बालके असून ते १५ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत.
घनश्याम उर्फ रोशन रमेश भजने (२0) रा. माकडे नगर तुमसर, शाम मनोहर कुंदवानी (२0) रा. शिवाजी वार्ड तुमसर अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तर उर्वरित तीन आरोपी हे विधीसंघर्ष अल्पवयीन बालके असून त्यातील एक मुलगा हा तुमसरातला तर दोघे मोहाडी तालुक्यातील एलोरा येथील आहे.
तुमसर शहरातील माकडे नगरातील गल्ली नं. १६ येथे आपल्या टॅटूच्या दुकानासमोर बसलेल्या मोनू गेडाम याच्यावर ५ अज्ञात तरुणांनी मिरची पावडर टाकून त्याच्या गळ्यावर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून दिवसाढवळ्या हत्या केली होती. हत्येनंतर या पाचही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंग बिसेन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, तुमसरचे ठाणेदार नितीन चिंचोळकर यांनी घटनास्थळ गाठले. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, नितीन मदनकर, पोलिस उपनिरीक्षक टेकाम, धर्मेंद्र बोरकर, विजय राऊत, क्रि ष्णा बोरकर, कैलास पटोले, जयसिंग लिल्हारे, अजय बारापात्रे, मंगेश गेडाम, अमोल खराबे, आशिष तिवाडे यांचे पथक तयार करुन विविध ठिकाणी पाठविण्यात आले. तपासाची चक्रे फिरविताच काही तासातच आरोपींना गजाआड करण्यात आले.

Leave a Reply