संपादकीय संवाद – पवार घराण्यातील छुपा संघर्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उघड केला

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे चांगलेच वाभाडे काढले, एरवी पत्रकारांनी विचारल्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या शरद पवारांनी या आरोपांना उत्तर देण्यासाठी ताबडतोब पत्रपरिषद बोलावली.
त्या पत्रपरिषदेत आपली बाजू मांडतांना शरद पवारांनी राज ठाकरे यांना आणि त्यांच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नसते अश्या आशयाचे विधान केल्याचे वृत्त आहे. जर राज ठाकरे यांचे आरोप गांभीर्याने घेण्याजोगे नाहीत, तर पवारांना इतक्या तातडीने पत्रपरिषद घेऊन आपली बाजू मांडण्याची गरज का वाटली? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला भेडसावल्यास नवल वाटू नये.
काल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव पुत्र आदित्य यांच्याबाबत हा उल्लेख केला होता, संपलेल्या पक्षाबद्दल बोलायची गरज नाही, असे म्हणतात पण तरीही वारंवार बोलतात, या शब्दात त्यांनी या विरोधकांची खिल्ली उडवली होती. आज पवारांनी नेमके तेच केले आहे. राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हणत त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याचा त्यांनी जमेल तसा प्रयत्न केला आहे.
असे असले तरी राज ठाकरे यांनी पवारांवर बरेच गंभीर आरोप केले आहेत. त्यात त्यांनी पक्षातील नव्हे तर कुटुंबातीलच मंडळींना अडचणीत आणण्यासाठी काय केले? याचा गोषवारा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन भावंडांमधला छुपा संघर्ष आता उघड झाला आहे. या दोघांनाही पवारांची गादी हवी आहे. दोघांचाही संघर्ष चालूच असतो, मात्र ईडीच्या धाडी फक्त अजित पवार यांच्यावर पडल्या त्या सुप्रिया सुळेंवर का पडल्या नाहीत असे विचारतांना यासाठी पवार पंतप्रधान मोदींच्या कानाला लागले होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. म्हणजेच मुलींसाठी पवार पुतण्याचा देखील बळी द्यायला तयार आहेत हे महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.
हे जर खरे असेल, तर हे प्रकरण खरोखरी गंभीर मानावे लागेल. राजकारणात कुणीही कुणाचाही नसतो, हे यातून दिसून येत आहे. पेशव्यांच्या काळात राघोबादादा पेशवेंनी पेशवाईची वस्त्रे मिळावी म्हणून सख्खा पुतण्या नारायणरावाचा वध गारद्यांच्या हाताने घडवून आणला होता. असे बोलले जाते. इथे पुन्हा एकदा सख्खा काका पुतण्याच्या राजकीय करियरवर उठला असे दिसून येत आहे. खरे खोटे काय? हे कालांतराने दिसून येईलच मात्र पवार घराण्यातला छुपा संघर्ष राज ठाकरे यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा उघड केला हे दिसून आले आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply