देवेंद्र फडणवीसांनी आता मी पुन्हा येईन हे विसरुन जावे – एकनाथ खडसे

जळगाव : १३ एप्रिल – महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांचे हे सर्व प्रयत्न आता असफल ठरले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. ‘सत्ता नसल्याने गुदमरत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मी पुन्हा येईन हे विसरुन जावे’, असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १५ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या नियोजनार्थ तसेच विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाषणात एकनाथ खडसेंनी जोरदार फटकेबाजी केली. अनेक चुकीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपकडून सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला. मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ४० वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच एवढे घाणेरडे राजकारण मी अनुभवत आहे.
सत्ता नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीव गुदमरत आहे. मात्र, कुणाही काहीही म्हणत असले तरी, कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढचेही वर्ष यशस्वीपणे हे सरकार पार पाडेल. पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, मी पुन्हा येईन हे कायमचेच विसरुन जावे, घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने नाकारले आहे. असाही टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात मी व किरीट सोमय्या एकत्र आलो. या कार्यक्रमाच्या शुटींगदरम्यान मी सोमय्यांना म्हणालो की, “आज तुम्ही तुपांमध्ये आहेत व जे जात्यात आहेत त्यांना हसताहेत, पण केव्हा कोण तुपात जाईन आणि कोण जात्यात जाईन हे सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा”, असं सोमय्यांना सांगितल्याचंही एकनाथ खडसे भाषणात सांगताना विसरले नाही. याचप्रमाणे आता किरीट सोमय्या हे जात्यात अडकले आहेत, म्हणजेच दुसऱ्यावर आरोप करणारे सोमय्या आता स्वत:च आरोपीच्या पिंजऱ्यात अडकले असल्योचही खडसे यावेळी म्हणाले.

दुसऱ्यावर दगडफेक करतांना स्वत: स्वच्छ असलं पाहिले नाहीतर आपल्यावर उलट दगडफेक होते. हीच परिस्थिती सोमय्या यांची झाली आहे, त्यांच्यात आरोपात कुठलेही तथ्य नाही, केवळ बदनाम करण्याच काम या माध्यमातून सुरु असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

Leave a Reply