आता वाट “पुरवणी सभेची” – अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

अकोला : १३ एप्रिल – मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यावर ट्विट करत टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही सभा घेतली होती. यावरुन अमोल मिटकरी यांनी टोला लगावत आता पुरवणी सभा घ्या म्हटलं आहे.
“जहिर सभा”, “उत्तर सभा” आता वाट “पुरवणी सभेची”. सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न…वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Leave a Reply