अमेरिकेत मेट्रो स्थानकात अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार, १६ जण जखमी

न्यूयॉर्क : १३ एप्रिल – अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रूकलॅन या भुयारी मेट्रो स्थानकात अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात १६ जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ८.३० वाजता हा हल्ला झाला असून स्थानक परिसरात काही स्फोटकेही सापडली आहेत. हा दशहतवादी हल्ला असल्याची शक्यता अमेरिकी प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये अतिदक्षता जाहीर करण्यात आली असून मेट्रो रेल्वेवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ब्रुकलॅन स्थानकात सकाळी मेट्रोगाडीची वाट पाहत अनेक प्रवास जमले होते. त्यावेळी हल्लेखोराने बेधुंद गोळीबार केला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर अनेकांचे कपडे रक्ताने माखले असल्याची छायाचित्रे काही प्रवाशांनी ट्वीट केली आहेत. हल्लेखोर स्थानिक असल्याचा संशय स्थानिक माध्यमांनी व्यक्त केला आहे. स्थानकात स्फोटके सापडली असली तरी कोणत्याही स्फोटकांचा स्फोट झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोळीबार करणारा हल्लोखोर एकटा होता आणि त्याने बांधकाम कामगारांसारखे नारिंगी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. त्याने गॅस मास्कही परिधान केले होते. त्याच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. त्याने सकाळी गर्दीच्या वेळी मेट्रो स्थानकावर धुराचा डबा फेकला आणि मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण झाल्यानंतर बेछुट गोळीबारा केला, अशी माहिती न्यूयॉर्क पोलीस विभागाकडून देण्यात आली.
मेट्रो स्थानकावरील हल्ल्यानंतर अनेकांनी त्यासंदर्भातील छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या. स्थानकावर मोठय़ा प्रमाणात धूर झाल्यानंतर काही तरी जळाले असल्याच्या शक्यतेने अनेक जण एका ठिकाणी जमल्याचे आणि त्यानंतर गोळीबार झाल्याचे दिसून आले. अनेकांचे कपडे रक्ताने माखले होते. असल्याची काही छायाचित्रे समाजमाध्यतांवर प्रसारित झाली. मेट्रो डब्याच्या छतावरही रक्त पसरल्याचे दिसून आले. जखमी झालेले काही प्रवासी जमिनीवर पडल्याचेही काही छायाचित्रांत दिसून आले.

Leave a Reply