संपादकीय संवाद – मशिदीवर धनिक्षेपक लावून बांग देणे ही परंपरा नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी मशिदींवर लाऊडस्पिकर लावून अजान देण्यास विरोध केला आहे, तसे झाल्यास कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर लाऊडस्पिकर लावून हनुमान चालीसा वाजवा, अश्या सूचना दिल्या आहेत. ठाकरे यांच्या या सूचनेला रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. परंपरागत भोंग्यांना विरोध करण्यासाठी आपणही भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुळात प्रश्न असा येतो की, अश्या प्रकारे मशिदीवर भोंगे लावून अजान देणे ही मुस्लिम परंपरा आहे काय? असे करावे याबाबत कुराण किंवा तत्सम धर्मग्रंथात काही सूचना तरी दिल्या आहेत काय? खोलात गेल्यास याचे उत्तर नकारार्थीच मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्लाम धर्म हा सुमारे २ हजारहून अधिक वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आहे. त्या काळातच मशिदी निर्माण झाल्या असतील, आणि अल्लाची प्रार्थना करण्यासाठी अजान देत नमाज पढणेही त्याच काळात सुरु झाले असेल. त्या काळात आजच्यासारखी धनिक्षेपक म्हणजेच लाऊडस्पिकर व्यवस्था होती काय? याचे उत्तर नकारार्थीच मिळते. लाउड्स्पिकरचा शोध लागून ते प्रचलित झाले ते गेल्या दीडशे ते दोनशे वर्षात त्याआधी अशी कोणतीही व्यवस्था नव्हती, मग मशिदीवर लाऊडस्पिकर लावून अजान देणे ही परंपरा कशी असू शकते?
मशिदीवर भोंगा लावून अजान देण्याची प्रथा जगभरात अस्तित्वात असलेल्या ५० हुन अधिक मुस्लिम बहुल देशांमध्ये कुठेही नाही असे जाणकार सांगतात. मुस्लिम समाज जगभरात पसरला आहे, त्याचप्रमाणे जगभरात मुस्लिमांच्या मशिदीदेखील आहेत. मात्र इतर देशांमध्ये अश्याप्रकारे धनिक्षेपक लावून अजान देण्याची प्रथा असल्याचे कुणीही जाणकारांनी सांगितलेले नाही. मग भारतातच ही परंपरा आहे, असे कसे म्हणता येईल?
भारतात सार्वजनिक ठिकाणी धनिक्षेपक लावून कोणताही कार्यक्रम करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते, मात्र कोणत्याही मशिदीच्या अशी परवानगी घेतली नसावी. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याची प्रथा सुरु झाली, त्यांच्यासाठी अश्या प्रकारे कायदा धाब्यावर बसवला गेला, आणि दिवसभर धनिक्षेपकावरून बांग दिली जाऊ लागली, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र लांगूलचालनामुळे त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
आता परिस्थिती बदलली आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलला आहे, ज्या धार्मिक परंपरा नाहीत तरीही हट्टाने केल्या जात आहेत, त्यांना विरोध व्हायलाच हवा, त्यामुळेच राज ठाकरे यांना जनसमर्थन मिळते आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply