जातीपातीचं राजकारण या मुलांना तरी शिकवू नका – मनसेचे प्रकाश आंबेडकरांना आवाहन

मुंबई : १२ एप्रिल – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मशिदीवरील भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. राज यांच्या या भूमिकेवर सुजात आंबेडकर यांनी जोरदार निशाण साधत आधी तुमच्या मुलाला रस्त्यावर उतरायला सांगा, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता दंगली घडवण्यात उच्चवर्गीय ब्राह्मणच पुढे असतात, असं त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांनाच आवाहन केलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी कृपा करून अशा प्रकारचे संस्कार मुलावर करू नयेत. मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे जाईल, पण जातीपातीचं राजकारण या मुलांना तरी शिकवू नका,’ असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला आहे.
दुसरीकडे, राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. मशिदीबाबतच्या भूमिकेवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर राज ठाकरे आपल्या सभेतून जोरदार प्रहार करण्याची शक्यता आहे. तसे संकेतही मनसे नेत्यांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज राज यांची तोफ नक्की कोणाविरोधात धडाडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply