‘मी माझ्या साहेबांसबत’ – राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीनंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

मुंबई : ११ एप्रिल – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची तडकाफडकी शहराध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीने ऑफर दिली होती. मात्र, वसंत मोरे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा ‘ट्रॅक’वर परतले आहे. ‘मी माझ्या साहेबांसबत’ असं सांगत वसंत मोरेंनी सूचक फोटो शेअर करून आपण मनसेतच राहणार असं सुचवलंय.
मशिदीवरील भोंग्याबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यामुळे मनसेत बोंबाबोब सुरू झाली. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना पदावरून काढल्यानंतर आज मनसेची बैठक पार पडली. या बैठकीला वसंत मोरेंना बोलावण्यात आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे यांची चर्चा झाली.
या बैठकीनंतर वसंत मोरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वसंत मोरे यांनी राज ठाकरे आणि साईनाथ बाबर यांच्यासोबतचा फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला आहे. मी माझ्यासाहेबांसोबत…आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…! जय श्रीराम..! असा मजकूर टाकून आपण समाधानी असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
दरम्यान, या बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. ‘आज वसंत मोरे बैठकीसाठी हजर झाले. नुकतीच त्यांची बैठक संपलेली आहे. बैठकीत जे काही होईल ते स्वतः वसंत मोरे सांगतील. मी अन्य बैठकीसाठी आलो होतो. त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. आमच्या नेत्यांमध्ये याबाबत नाराजी नाही राज ठाकरे स्वत: यावर बोलतील, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली.

Leave a Reply